Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:28 PM2024-11-02T14:28:21+5:302024-11-02T14:28:36+5:30

मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास कारवाई होणार

Will workers get a day off on election day? Collector's instructions to entrepreneurs | Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

पुणे : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रक जारी केल्याची माहितीदेखील डॉ. दिवसे यांनी दिली आहे.

या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदानासाठी मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील; अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

...तक्रार आल्यास थेट कारवाई

मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Will workers get a day off on election day? Collector's instructions to entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.