भिगवण ठाण्याला इमारत मिळणार का?
By Admin | Published: July 12, 2016 01:50 AM2016-07-12T01:50:16+5:302016-07-12T01:50:16+5:30
जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’
भिगवण : जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यातून दोन वर्षांपूर्वी विभाजन करण्यात आलेल्या भिगवण पोलीस ठाण्याला ‘कोणी हक्काची जागा, इमारत देताय का...?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. १५ गावे आणि ३५ वाड्यावस्त्यांचा कारभार सध्या पूर्वीच्या दूरक्षेत्र पोलीस चौकीतूनच करावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागतो.
पोलीस ठाण्याला तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी; त्याचबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय झाली
पाहिजे, अशी मागणी होत आहे.
दोन वर्षांपूर्वी भिगवणला नव्या पोलीस ठाण्याला मान्यता मिळाली; परंतु पोलीस ठाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष झाले.
भिगवण तसे संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर या ठाण्याअंतर्गत १५ गावे, ३५ वाड्या येतात. कार्यभार मोठा आहे. सध्या ५० पोलीस कर्मचारी या ठाण्यात
कार्यरत आहेत. त्यांतील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित पोलिसांच्या जिवावर
कायदा-सुव्यवस्था राखावी लागते. महामार्गावरील मोठे गाव, बाजारपेठ असल्यामुळे भिगवणला आसपासच्या गावांसह सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील नागरिकांचीदेखील रेलचेल असते.
भिगवणची लोकसंख्या ११ हजारांहून अधिक आहे. याच परिसरात शैक्षणिक संकुलांची उभारणी झाल्यामुळे शिक्षणासाठी अन्य तालुका, जिल्ह्यातून आलेल्यांची संख्या १५ ते २० हजार इतकी आहे. जातीय सलोखा राखण्याबरोबरच महामार्गावरील अतिक्रमण रोखण्यासह अन्य कामे पोलिसांकडेच आहेत.
भिगवणला २३ आॅगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच इमारतदेखील बांधण्यात येईल, असे सांगितले.
मात्र, सध्या पूर्वीच्याच चौकीत कामकाज सुरू आहे. ५० पोलीस कर्मचारी, २ अधिकाऱ्यांना १० बाय १५च्या खोलीतून कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सततचे अपघात, राजकीय नेत्यांचे दौरे आदींचा ताण
पोलिसांवर असतोच; मात्र किमान रात्रीच्या वेळी काही वेळ आराम करण्यासाठीदेखील सोय नाही. त्यामुळे पोलिसांच्या मानसिक तणावात वाढ होते. (वार्ताहर)