शेतात जाताना बिबट्या दिसेल का? त्याच्या पावलांचा वावर भरवतोय धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:23 AM2022-12-12T10:23:10+5:302022-12-12T10:23:20+5:30
काही वर्षांपूर्वी नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता तालुक्यातील बहुतांश भागात दिसू लागला आहे
कारेगाव : शिरुर तालुक्यात मागील काही वर्षांपूर्वी नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता तालुक्यातील बहुतांश भागात दिसू लागला आहे. परंतु, शेतात जाताना बिबट्या दिसेल का? शेजारील उसात असला तर काय? कृषिपंपाची वीज रात्र पाळीत असेल तर रात्रीच्या वेळेस पाणी कसे धरायचे? याच भीतीत शेतकरी जगत आहे त्यामुळे त्याच्या पावलांचा वावर शेतकरी व शेतमजुरांच्या मनात धडकी भरवत आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शिरुर तालुक्यात सध्या भीमा, घोडनदी, वेळ, चासकमान डावा कालवा, डिंबा कालवा, चिंचणी यामुळे तालुक्यातील अपवाद वगळला तर बहुतांश भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे बारमाही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. लहरी बाजारभावामुळे उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील काही वर्षांपूर्वी रानडुकरचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला होता. भुईमूग, मका व अन्य पिके फस्त करत होता. कळपाने रानडुक्कर दिसत असल्याने रात्रीच्या वेळेस कृषी पंप चालू बंद करायला जाण्यासाठी मर्यादा निर्माण झाल्या होत्या. परंतु, आता रानडुकराचे प्रमाण कमी झाले असून बिबट्याचा वावर वाढला आहे. तालुक्यातील सुमारे ७१ गावे बिबट प्रवण क्षेत्रात येत आहेत. सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने मर्यादा आल्या आहेत. ऊस पिकाच्या खालोखाल कांदा पीकही मोठ्या प्रमाणात तालुक्यात घेतले जाते. लागवड, खुरपणी यासाठी मजूर सातत्याने लागतात परंतु, तालुक्यात अनेक ठिकाणी यापूर्वी बिबट्याने दिवसा हल्ले केले आहेत. शेतात मजूर सोबतीला कोणी असल्याशिवाय असल्याशिवाय काम करत नाहीत. तसेच रात्रीचा विद्युत पुरवठा पाळी असल्यावर शेतकऱ्यांना पाणी धरण्यासाठी रात्रीच्या वेळेस जावे लागत आहे. अनेकदा दिवसा वीज देण्याची मागणी करूनही दिवसपाळीत वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पर्याय शिल्लक राहत नाही. रात्रीच्या अंधारात बिबट्या दिसेल का याच धास्तीखाली शेतकरी जीव मुठीत धरून रात्री पाणी धरण्यासाठी जात आहे.
वनविभागामार्फत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक
शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात अनेकदा बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. या भागात सिंचनाखालील क्षेत्र अधिक आहे. रात्रपाळीत कृषिपंप विद्युत पुरवठा असल्यावर शेतकऱ्यांना रात्री पाणी धरणे, कृषिपंप चालू बंद करणे, यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने दिवसपाळीत विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे, तसेच वनविभागामार्फत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक आहे.- नाथाभाऊ शेवाळेजनता दल (सेक्युलर)
एकटे न जाताना दोघांनी जावे
शेतकऱ्यांनी घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. शक्य असल्यास घर व गोठ्याला कुंपण घालावे. घरालगत ऊस लागवड करू नये. रात्रीच्या वेळेस शेतात जाताना काठी हातात ठेवावी व मोबाइलवर गाणी लावावी. एकटे न जाताना दोघांनी जावे. - मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरुर.