ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 02:57 PM2024-09-12T14:57:27+5:302024-09-12T14:57:57+5:30

शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानाही पोलिसांनी रात्री ११ वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले

Will you show this courage in front of the bullies The hotel operator was harassed by the police in Chatu:Shringi | ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

पुणे : शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असताना देखील चतुःश्रृंगी पोलिसांनी मात्र सोमवारी (दि. ९) रात्री सव्वा अकरा वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले. एवढेच नाही तर हॉटेल मधील साहित्याची मोडतोड करून धमकावले. एकाचवेळी तीन गाड्यांचा ताफा घेऊन पोलिस ही कारवाई करण्यासाठी आले होते. दुसरीकडे शहरात गुंडांचा धुडगूस सुरू आहे. खुनाचे सत्र थांबता थांबत नाहीये. रस्तोरस्ती जबरी चोरट्यांची दहशत कायम आहे. असे असताना, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशिष्ट हेतू ठेवून धमकावले जात असेल तर, पोलिस ही पोलिसगिरी गुंडांपुढे दाखवण्यात का अयशस्वी होत आहेत, असा संतप्त सवाल व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

ज्ञानेश्वर पादुका चौकातील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याचवेळी चतुःश्रृंगी हद्दीतील बाणेर, बालेवाडी, औंध, सेनापती बापट रस्ता परिसरातील सर्व हॉटेल्स, अंडाभुर्जीच्या गाड्या, पान टपऱ्या रात्री उशिरापर्यंत चालू होत्या. कदाचित पोलिसांच्या नजरेस हे दिसले नसावे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. रात्रीचे ११ वाजून १४ मिनिटे झाली होती. तेवढ्यात चतुःश्रृंगी पोलिसांच्या तीन गाड्यांचा ताफा तेथे आला. त्यामध्ये एक सीआर मोबाइल, पीटर मोबाइल व अन्य एक डीबीची गाडी असावी. हॉटेलचे गेट बाहेरून बंद होते. पांढरा शर्ट घातलेले पोलिस कर्मचारी आतमध्ये आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. पोलिसांनी गल्ल्यावर बसलेल्या हॉटेल मालकाला धक्काबुक्की करत बाहेर ओढले. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्यासारखे समजून त्याच्या मानगुटीला पकडून बाहेर ओढले. त्याचवेळी त्याच्या पाठीत पोलिसाने काठी मारली. तुला समजत नाही का? पोलिस आल्यानंतर गाडीत जाऊन बसायचे असे म्हणून धमकावले. त्यानंतर हॉटेलमधील आचाऱ्याला पकडून मारहाण करत गाडीत बसवले. त्याच्या हाताला काठीचा मार लागला. पोलिसांनी हॉटेल सुद्धा त्यांना बंद करू दिले नाही. त्यानंतर दोघांना गाडीत बसवून, आधी वडारवाडी पोलिस चौकीत नेले त्यानंतर पोलिस ठाण्यात आणले.

तेथे हॉटेल मालकाला मी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवले, असे लिहून देण्यासाठी धमकावले. रात्री उशिरापर्यंत त्यांना बसवून ठेवून सोडून देण्यात आले. पोलिसांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्यात जावे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अशा पदाचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.

Web Title: Will you show this courage in front of the bullies The hotel operator was harassed by the police in Chatu:Shringi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.