अवैध वाहतुकीवर कारवाई करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2016 01:38 AM2016-02-06T01:38:28+5:302016-02-06T01:38:28+5:30
चाकण शहरात बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्थेची घडी पुन्हा सुस्थितीत करण्याचा प्रयत्न सध्या नव्याने रुजू झालेल्या चाकण पोलिसांकडून केला जात आहे.
आंबेठाण : चाकण शहरात बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्थेची घडी पुन्हा सुस्थितीत करण्याचा प्रयत्न सध्या नव्याने रुजू झालेल्या चाकण पोलिसांकडून केला जात आहे.
सध्या ज्या प्रमाणे रोडरोमिओ, बेदरकारपणे दुचाकी चालविणारे तरुण, भंगारमाफिया यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे, तशी कारवाई चाकण आणि परिसरात बोकाळलेल्या अवैध वाहतुकीविरोधात केली जाईल का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. चाकण शहर आणि चाकणपासून आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली असून, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने अवजड आणि ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक वाहतूक करणारी वाहने ही कालबाह्य झालेली आहेत. ही वाहने इतर जिल्ह्यांतील असल्याने त्यांचा कर ना तिकडे भरला जातो ना इकडे. त्यामुळे अशा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडविला जात आहे. सध्या आंबेठाण चौक, तळेगाव चौक, शिक्रापूर रोड, याशिवाय आळंदीकडे जाणारी वाहने, तळेगाव दाभाडेकडे जाणारी वाहने, राजगुरुनगर शहराकडे जाणारी वाहने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोसरी रस्ता ही अवैध वाहतुकीची प्रमुख ठिकाणे आहेत. याशिवाय एमआयडीसी परिसरात भांबोली ते खालुंब्रे रस्ता, तळवडे रस्ता अशा अनेक ठिकणी ही अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे.