तुमचे थोबाड रंगवल्यावर समजेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:11+5:302021-09-15T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर असभ्य वक्तव्य करणारे विधान परिषदेचे विरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर असभ्य वक्तव्य करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तुमचे थोबाड रंगवल्यावर समजेल का? अशा शब्दांत सुनावले आहे.
पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार देत माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असे सौम्य उत्तर दिले. चाकणकर यांनी मात्र दरेकर यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. चाकणकर म्हणाल्या, विधानपरिषद हे ज्येष्ठांचे अभ्यासू व्यक्तींचे सभागृह आहे. दरेकर यांचा व अभ्यासाचा सुतराम संबंध दिसत नाही, हे त्यांच्या बोलण्यावरून दिसते. महिलांबाबत असभ्य भाषेत बोलणे ही त्यांच्या पक्षाची परंपराच आहे. त्यांच्या पक्षात महिला का काम करतात, असा प्रश्न मला पडला आहे, असे चाकणकर म्हणाल्या. अशा असभ्य वक्तव्याबद्दल दरेकर यांनी समस्त महिलांची माफी मागावी, अन्यथा आम्हालाच त्यांचे थोबाड रंगवावे लागेल, असा इशारा चाकणकर यांनी दिला.
खासदार सुळे यांनी दरेकर यांच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला तरी बलात्काराच्या घटनेवर मत व्यक्त करताना त्यांनी अशा घटनांची त्वरित चौकशी, तपास करून दोषींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असे सांगितले. सर्व महिलांची अशीच मागणी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना तपासाबाबत सूचना केल्या. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खासदार सुळे यांनी आभार मानले.
फोटो - रूपाली चाकणकर, प्रवीण दरेकर