बेभान झाला वारा, वीज अन् पाऊस घेऊन आला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 01:50 AM2018-10-03T01:50:13+5:302018-10-03T01:50:37+5:30
शहरात मंगळवार सकाळपासून उकाडा जाणवत होता़ सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली़ त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहू लागला़ सायंकाळी साडेसातनंतर
पुणे : दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री आलेल्या जोरदार पावसाने शहर व उपनगरात दाणादाण उडवली़ कोरेगाव पार्क, येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर झाडपडीच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला़ शहरात किमान १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.
शहरात मंगळवार सकाळपासून उकाडा जाणवत होता़ सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली़ त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहू लागला़ सायंकाळी साडेसातनंतर अचानक जोरदार पावसाची बरसात सुरू झाली़ शहरासह खडकवासला, धायरी, कोंढवा, येरवडा, कात्रज भागात सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली़ कोरेगाव पार्क भागातील लेन नं़ ५, नॉर्थ मेन रोडवर ७ ते ८ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली़ शासकीय विश्रामगृहाजवळ एक मोठे झाड रस्त्यात पडल्याने तेथे वाहतूककोंडी झाली होती़
कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवर अनेक ठिकाणी एकाच वेळी झाडपडीच्या घटना घडल्या़ त्यात जोरदार पावसाने जागोजागी तळे साचले़ रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांवर झाडे पडल्याने त्यात काही गाड्यांचे नुकसान झाले़ रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली़ त्यामुळे अनेक ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यात अडचण आली़ जेथे रस्त्यावर व गाड्यांवर झाडे पडली त्या ठिकाणी प्रथम जाऊन अग्निशमन दलाचे जवान ती झाडे हटविण्याचे काम करीत होते़
कोरेगाव पार्क परिसरात जवळपास ७ ते ८ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते़ झाडे पडल्याने काही मोटारी व रिक्षांचे नुकसान झाले़ नॉर्थ मेन रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली़ यावेळी परिसरातील तरुणाई मदतीला धावली़ त्यांनी रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला केल्या. झाडाच्या फांद्यांखाली दबलेली वाहने बाजूला केली व तासाभराने येथील वाहतूक सुरू झाली़