इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:09+5:302021-05-28T04:10:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासर जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळी बागांना याचा ...

Wind gusts to Indapur | इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा

इंदापूरला वादळी वाऱ्याचा तडाखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदापूर : इंदापूर तालुक्याला गुरुवारी वादळी वाऱ्यासर जोरदार पावसाचा तडाखा बसला. यात तालुक्यातील केळी बागांना याचा सर्वाधिक फटका बसला. गंगावळण, कळाशी तसेच निमगाव केतकी व इतर परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख स्वरूपात भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.

इंदापुर, बारामती तालुक्यातात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले. सकाळी ११ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोरोनामुळे आधीच शेतकरी अडचणीत होते. त्यात शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून केळीचे पीक व उसाचे पीक यंदा जोमात आणले होते. मात्र, वादळी वाऱ्याचा तडाख्यामुळे केळीच्या बागा लोळल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मशागतीचा खर्चदेखील हातामध्ये पडणार नाही. वाऱ्याच्या झोतामुळे उसाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोठ्या प्रमाणात ऊस जागीच झोपले आहेत. या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असाही आशावाद महारुद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कोट

आमच्या शेतातील तब्बल अडीच एकर केळी काढणीसाठी आली होती. साधारणपणे आठ ते साडेआठ लाख रुपये या वेळी बागेमधून उत्पन्न हमखास मिळणार होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर केळी कोसळली आहे. सर्व बाग भुईसपाट झाल्यामुळे हे उत्पन्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांना शासनाच्या माध्यमातून रोख स्वरूपात भरपाई मिळावी.

-विनोद पाटील, शेतकरी

---

चौकट

निमसाखर येथेही पाऊस

निमसाखर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. सध्या उन्हाच्या झळा दिवसभर लागत असून, उन्हामुळे लोक हैराण होत असताना झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले

बारामती : इंदापूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले. सणसर भवानीनगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने या भागातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

येथील ग्रामस्थांनी वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाचा अनुभव घेतला. एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरू होते. तसेच पावसाने ठिकठिकाणी पाणी साठल्याने परिसराला छोट्या तळ्याचे स्वरूप आले होते. या पावसाने विजेचे खांब जमीनदोस्त झाले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे.

भवानीनगर लगतच्या शेरपुलावरील भरावावर बाभळीचे झाड पडल्याने येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. भवानीनगर येथील साखर कारखान्यासमोरील तीन मोठी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. शेवटी पोलिसांनी रस्त्यावर उतरत येथे एकेरी वाहतूक सुरळीत केली आहे.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला. या वेळी काही काळ गारांचादेखील पाऊस सुरू झाला होता. मात्र, ७ च्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. यामध्ये सापडलेली वाहने, नागरिक भयभीत झाले. काही ज्येष्ठ नागरिकांना येथील युवकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे अनर्थ टळला. वादळी वारे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील नागरिक आणखी धास्तावले. पाऊस कमी होईपर्यंत अनेक नागरिक मिळेल त्या आडोशाला मुठीत जीव घेऊन थांबले होते. पावणेआठच्या सुमारास पाऊस थांबला. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

चौकट

सणसरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्याचे ऊस, मका, कडवळ ही पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. केळी ह वांगी, टोमॅटो, मिरची या पिकांचे ही पावसामुळे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी आडसाली उसासाठी सऱ्या काढल्या आहेत. त्या सऱ्यांमध्ये पाणी साठले. त्यामुळे या मोकळ्या सऱ्यांमध्ये गवत येऊन त्याचाही खर्च ऊस लागणीच्या अगोदर शेतकऱ्यास सोसावा लागणार आहे. एकंदरीतच अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत जाणार आहे. तालुक्यातील निमसाखर येथे मोठ्या प्रमाणत सुसाट वेगाने वारे वाहिले. परंतु पाऊस मात्र रिमझिम झाला. सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाली असल्याने काही प्रमाणात पुढील काळात पाणीटंचाईपासून उसंत मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे.

फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील गंगावळण, कळाशी भागातील केळी बागा भुईसपाट झाल्या.

Web Title: Wind gusts to Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.