सातारा रस्त्यावर हवा भुयारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:05 AM2017-08-09T04:05:39+5:302017-08-09T04:05:39+5:30
मृत्यूचा सापळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बीआरटी रस्त्याची डागडुजी व रस्तारुंदीकरणाचे काम सध्या कात्रज भागात वेगाने सुरू आहे. कुठलाही पुढील विचार न करता ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका सर्वत्र होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बीआरटी रस्त्याची डागडुजी व रस्तारुंदीकरणाचे काम सध्या कात्रज भागात वेगाने सुरू आहे. कुठलाही पुढील विचार न करता ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम चालू असल्याची टीका सर्वत्र होत आहे.
सुमारे ७५ कोटींचा निधी खर्च करून, ‘कात्रज ते सातारा’ रस्त्यावरील लक्ष्मीनारायण चौकापर्यंत हे दुरुस्ती व रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. कात्रज डेअरीपासून-भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता जुन्या नकाशामध्ये ठेवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे कात्रज डेअरी, भारती विद्यापीठ, सरहद कॉलेज, कात्रज पीएमपी डेपो, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे या भागात नागरिकांनी कसे जायचे, असा प्रश्न नगरसेवक युवराज बेलदरे यांनी उपस्थित केला व त्या संदर्भात आयुक्तांचे लक्षदेखील याकडे वेधले.
त्यानंतर आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक वसंत मोरे, नगरसेवक अमृता बाबर यांनीदेखील हा सर्व्हिस रस्ता व्हावा, यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्ता दुरुस्तीच्या नकाशात बदल करून, ७ मीटरचा हा रस्ता करण्याचे मान्य करण्यात आले व त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले. यासंदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देऊन या भागाची तातडीने पाहणी करण्याची मागणी करणार असल्याचे बेलदरे यांनी सांगितले.
मिनिटाला १०० हून अधिक गाड्या
१ ‘कात्रज ते स्वारगेट’ या सातारा रस्त्यावर प्रत्येक मिनिटाला सुमारे १०० हून अधिक गाड्या जा-ये करतात. त्यामुळे ‘कात्रज ते बालाजीनगर’ उडाणपुलापर्यंत रस्ता नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो.
२ राजीव गांधी
प्राणिसंग्रहालयात दररोज हजारो पर्यटक येत असतात. रस्ता ओलांडताना अनेक वेळा या चौकात अपघात देखील झालेले आहेत.
३ त्यामुळे राजीव गांधी ‘प्राणिसंग्रहालय ते कात्रज’
डेअरीपर्यंत ग्रेडसेपरेटर (भुयारी मार्ग) केला, तर नागरिकांचीदेखील सोय होईल व येथील सिग्नल निघल्यामुळे कात्रज चौकातील वाहतूककोंडीसुद्धा कमी होईल, अशी मागणी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी केली आहे.