वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By admin | Published: April 22, 2015 05:38 AM2015-04-22T05:38:40+5:302015-04-22T05:38:40+5:30

दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी

Windy hail with windy winds | वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

Next


पिंपरी : दिवसभरात डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांवरून परावर्तित होणाऱ्या उन्हाच्या झळा, त्यातच वाफेसारखा जाणवणारा उकाडा व सायंकाळी पावसापूर्वी आलेले जोरदार वादळी वारे यामुळे मंगळवारचा दिवस पुन्हा अवकाळीचे भय दाटविणारा ठरला. निगडी, यमुनानगर, चिखली परिसरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शहरात इतरत्र व लगतच्या भागात पाऊस झाला.
आठवड्यापासून परिसरात वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने सर्वांना हैराण केले आहे. अधूनमधून येणारे ढगाळ वातावरण, पण पाऊस पडत नसल्याने उकाड्याने सर्वांना बेचैन केले. मंगळवारी तर या विचित्र वातावरणाचा कळसच झाला. आजवर कधी न अनुभवास आलेल्या समुद्रसपाटीच्या दमट वातावरणाचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे घामाच्या धारा वाहण्यास भाग पाडणारा दमटपणा आणि आग ओकणाऱ्या सूर्यामुळे असह्य झालेल्या उन्हाच्या झळा यामुळे थोडा वेळही बाहेर थांबणे जेरीस आणत होते. दुपारनंतर दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे पाऊस होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास या कोंदट वातावरणातच जोरदार घालमेल सुरू झाली अन् अचानकच सर्वत्र सोसाट्याचा वारा सुटला. क्षणातच चक्राकार फिरणाऱ्या या वादळात धुळीचे लोट, पालापाचोळा मिसळला. सैरभैर उधळणाऱ्या पालापाचोळ्याची गत पाहून आता पावसाचे मोठे संकट पुढे ठाकल्याचे वाटू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे झुकत होती. निगडी येथे वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक जाहिरातफलकांचे नुकसान झाले आहे. धुळीच्या लोटासह वादळी वाऱ्याचे असे चित्र तेही शहर परिसरात बऱ्याच वर्षांनंतर दिसू लागल्याने प्रथमत: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी जोरदार वादळी पावसाच्या भीतीने वेळीच सुरक्षितस्थळी पोहोचण्याची खबरदारी घेतली.
थोड्या वेळातच निगडी, देहूरोड, तळवडे, चिखली, किन्हई या पट्ट्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. निगडी, प्राधिकरण भागात थोडा वेळ गारांसह पाऊस बरसला. सुटीचा आनंद लुटणाऱ्या शाळकरी मुलांनी गारा वेचून खाण्याची संधी दवडली नाही. तळवडे परिसराला पंधरा मिनिटांहून अधिक वेळ पावसाने झोडपून काढले. दिवसभर उन्हामुळे घरी बसलेले शेतकरी सायंकाळी ऊन उतरताच भाजीची तोडणी करण्यास शेतामध्ये गेले. मात्र त्याच वेळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतमालाची तोडणी न करताच माघारी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. वारंवार होणाऱ्या पावसाला वैतागून अनेक वीटभट्टी व्यावसायिकांनी कोणत्याही उपाययोजना करण्याचे टाळून विटांना पावसाच्या हवाली केल्याचा प्रत्यय या परिसरात आला.
खरेदीदारांची निराशा
अक्षय्य तृतीया असल्याने मंगळवारी अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होत.
मात्र नेमका याच वेळी पाऊस
सुरू झाल्याने अनेकजणांना
खरेदी करणे शक्य झाले नाही. काही जणांनी पाऊस थांबल्यावरच बाहेर पडणे पसंत केले.(प्रतिनिधी)

Web Title: Windy hail with windy winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.