नागपूर, भंडारा, गोंदियाला वादळी पाऊस
By admin | Published: May 29, 2017 04:28 AM2017-05-29T04:28:27+5:302017-05-29T04:28:27+5:30
कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळी वादळी पावसाने चिंब केले. भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातही
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर/पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळी वादळी पावसाने चिंब केले. भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. ३० व ३१ मे रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दिवसभर कडाक्याचे ऊन तापल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले, आणि काहीच वेळात वादळी वाऱ्यांसह धो-धो पावसाला सुरुवात झाली. उपराजधानीतील लष्करीबाग, ओंकारनगर, श्रमजीवीनगर, सिव्हिल लाईन्स व रामनगर या भागात अनेक झाडे कोसळली. काहींच्या घरांवरील टिनांचे छप्परही उडाले. वरुडमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. वादळ, पाऊस व गारा आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अमरावती मार्गावरील झाड पडल्याने सुमारे दोन तास हा मार्ग विस्कळीत झाला होता. भंडाऱ्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले.