वादळी पावसाने पुण्याला झोडपले

By admin | Published: May 6, 2015 05:42 AM2015-05-06T05:42:21+5:302015-05-06T05:42:21+5:30

शहराच्या काही भागात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर दापोडी, बोपोडी, सिंहगड रस्ता परिसरासह काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली.

Windy rain damaged Pune | वादळी पावसाने पुण्याला झोडपले

वादळी पावसाने पुण्याला झोडपले

Next



पुणे : शहराच्या काही भागात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर दापोडी, बोपोडी, सिंहगड रस्ता परिसरासह काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्याही घटना घडल्या. शहरात सायंकाळपर्यंत ४.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेकडे झाली. पुढील आठवडाभर शहर व परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
शहर व परिसरात सकाळपासूनच आकाशात ढग दिसत होते. दुपारी दोननंतर आकाशात काळे ढग दाटून आले. त्याचवेळी वादळी वाराही सुटल्याने जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे नागरिकांची धावाधाव सुरू झाली. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाल्यानंतर काही वेळाने शहराच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचा केवळ शिडकावा झाला. पावसाला जोर नसल्याने नागरिकांची दैनंदिन कामे पावसाळी वातावरणात सुरू होती. तर शिवाजीनगर, येरवडा, दापोडी, बोपोडी, धायरी तसेच सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पाऊस पडला. काही भागात भागात वादळी वाऱ्यासह गाराही पडल्या. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. भर उन्हाळ््यात काहींनी रेनकोट घातल्याचेही पाहायला मिळाले. शहरात शिवाजीनगर परिसरात सायंकाळपर्यंत ४.४ मिमी पाऊस पडला. तर लोहगाव परिसरात ०.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेकडे झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शहर व परिसरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेपर्यंत शहर व परिसरात आठ ठिकाणांहून झाड पडल्याचे दुरध्वनी आले. (प्रतिनिधी)


आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता
पुणे शहर व परिसरात पुढील आठवडाभर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. बुधवारीही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना भर उन्हाळ््यात रेन कोट, छत्री बाहेर काढावी लागणार आहे.


तापमानात घट
शहरात पाऊस पडल्याने कमाल तापमानात सोमवारच्या तुलनेत सुमारे २ अंश सेल्सिअसची घट झाली. मंंगळवारी दुपारपर्यंत उन्हाच्या झळ््यांनी पुणेकर नागरिक त्रासले होते. दुपारनंतर वारे वाहू लागले. तसेच पाऊसही सुरू झाल्याने हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे किमान तापमानातही घट झाली. मंगळवारी शहरात ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी हे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस एवढे होते. किमान तापमानात मात्र ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

Web Title: Windy rain damaged Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.