शिरूर तहसीलदारांच्या कचेरीत दारूने अंघोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:44 PM2018-03-15T21:44:10+5:302018-03-15T21:44:10+5:30
क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी शिरूर तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली.
शिरूर : शिरूर तालुका संपूर्ण दारूबंदीसंदर्भात महसूल, राज्य उत्पादनशुल्क व पोलीस आदी विभागांनी गळचेपी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलक, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली. या वेळी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘अधिकारी मला व जनतेला वेठीस धरत असून, त्यामुळे १५ दिवस दररोज तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ करणार आहे,’ असा इशारा पाचंगे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
पाचंगे यांनी तालुका दारूबंदीसाठी १ मार्चपासून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. राज्य उत्पादनशुल्क विभागाने दारूधंद्यावर कारवाई करून दारूबंदी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे; अन्यथा दारूने अंघोळ करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला होता. कालपर्यंत कोणत्याच विभागाच्या अधिकानी पाचंगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदार रणजित भोसले यांच्या दालनात दारू अंगावर ओतून दारूने अंघोळ केली. पोलीस उपनिरीक्षक युसूफ इनामदार यांनी त्यांच्या हातातून बाटली घेतली.
दारूने अंघोळ करण्यापूर्वी पाचंगे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या बैठकीत राज्य उत्पादनशुल्क खात्याने जी आश्वासने दिली, त्याबाबत त्या खात्याचे अधिकारी अमर कावळे यांना ‘काय कारवाई केली?’ असे पाचंगे यांनी विचारले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूधंदे सुरू आहेत त्याबाबत काय म्हणणे आहे? असाही प्रश्न विचारला. याचबरोबर कलम ९३ नुसार दारूधंदेवाल्यांवर केलेल्या कारवाईची माहिती विचारली. मात्र, अधिकारी त्यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. शिरूरसह ४ तालुक्यांसाठी (दौंड विभाग) उत्पादनशुल्क विभागाकडे ३ अधिकारी, ४ कर्मचारी व एक चालक एवढाच स्टाफ असल्याचे कावळे यांनी सांगितले. यावर एवढ्या मोठ्या भागासाठी एवढेच कर्मचारी असतील व एकूणच यंत्रणाच नसेल, तर दारूचे परवाने देता कशाला? असा प्रश्न पाचंगे यांनी विचारला.
दारूबंदीची कारवाई न झाल्यास येत्या १५ दिवस दररोज तहसीदारांच्या दालनात दरूने अंघोळ करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला. याचबरोबर, तालुक्यातील दारूची दुकाने पेटवून देण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी, निमोणेच्या सरपंच जिजाबाई दुर्गे, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कडिले, जनाबाई मल्लाव, सुचित्रा डाळिंबकर, अंकुश जाधव, रोहिदास काळे, अशोक भुजबळ आदी उपस्थित होते.