‘नजरकैद’ने जिंकली मने; बारामतीत महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:07 PM2018-02-01T12:07:37+5:302018-02-01T12:10:11+5:30
महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली.
पुणे : महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्य स्पर्धेला बुधवारी बारामतीमध्ये सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ आणि भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाटकांनी रसिकांची मने जिंकली.
कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर (बारामती), एम. जी. शिंदे (पुणे), किशोर परदेशी (कोल्हापूर), राजाराम बुरुड (लातूर), मुख्य महाव्यवस्थापक रंजना पगारे (नाशिक), सहमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे (मुंबई) उपस्थित होते.
औरंगाबाद विभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या लातूरच्या परिमंडलाच्या रातमतरा नाटकाचे लेखन भगवान हिरे यांनी केले आहे, तर प्रमोद कांबळे यांचे दिग्दर्शन आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये भांडूप परिमंडलाचे नजरकैद हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखन अभिजित वाईलकर व दिग्दर्शन संदीप वंजारी यांनी केले आहे. या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा समारोप गुरुवारी सायंकाळी होणार आहे. त्यापूर्वी पुणे परिमंडलाचे ‘मेकअप १९८६’ व नागपूर परिमंडलाचे ‘ते दोन दिवस’ या नाट्यकृती सादर केल्या जाणार आहेत. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.