पुणे गारठले! शहरात ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:22 PM2022-11-19T12:22:17+5:302022-11-19T12:23:06+5:30
थंड वाऱ्यांमुळे राज्यात शुक्रवारी किमान तापमान घसरले...
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात शुक्रवारी किमान तापमान घसरले. यात पुण्याचे तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचा प्रभाव शनिवारीही कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर, पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
या हंगामातील निचांकी तापमान जळगाव येथे १०.३ अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर, नाशिकचा समावेश आहे. हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्री स्वच्छ आकाश आहे. थंड वाऱ्यांमुळे जमिनीचे तापमान रात्री कमी होत आहे.
कमाल तापमानातही सरासरीपेक्षी घट झाली आहे. शनिवारीही थंडीचा प्रभाव कायम राहील. रविवारी बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. ते पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकून त्याचा कमी दाबाचा पट्टा होण्याची शक्यता आहे. हे पट्टा तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढून किमान, तसेच कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.