Winter Session Maharashtra : थंडीत आणखी वाढ होणार..! पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव
By श्रीकिशन काळे | Published: December 10, 2024 03:45 PM2024-12-10T15:45:55+5:302024-12-10T15:46:19+5:30
सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच वाढले आहेत. परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये गुलाबी थंडीचा आनंद पुणेकरांना येत आहे. खूप कडाक्याची थंडी पडली नसल्याने पुणेकर सकाळी फिरायला जात आहेत. तसेच दिवसभर हवाहवासा गारवा वातावरणात आहे. या थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला. थंडीची लाट देखील येण्याचा धोका आहे.
सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच वाढले आहेत. परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली गेला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी (दि.९) पंजाबच्या ‘अमृतसर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
तसेच राज्यातील जळगाव, धुळे आणि नाशिक येथे तापमान १० अंशांच्या खाली गेले होते. पुण्यातील मंगळवारी सकाळी किमान तापमान १२ अंशावर नोंदवले गेले. दरम्यान, राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (दि.१०) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होत थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
पुण्यातील किमान तापमान
हवेली : १०.८
शिवाजीनगर : १२.३
बारामती : १४.३
एनडीए : १४.६
कोरेगाव पार्क : १६.८
लोणावळा : १७.६
वडगावशेरी : १७.८
मगरपट्टा : १८.८
उत्तर, मध्य, पश्चिम भारत (महाराष्ट्रासह) अधिक थंडीमध्ये गारठण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारत (विशेषतः तामिळनाडू, तटीय आंध्र प्रदेश, रायलसीमा) येथे अतिवृष्टीचा अनुभव होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिणेच्या मार्गे येणाऱ्या सध्याच्या प्रणालीचा पावसावर फारसा प्रभाव दिसणार नाही. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये १२-१४ डिसेंबर दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. १३ डिसेंबरपासून रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे . - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ