गणेश मंडळांनाे, प्रसाद तयार करताना 'ही' घ्या काळजी; FDA ने जारी केली नियमावली
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 16, 2023 04:09 PM2023-09-16T16:09:29+5:302023-09-16T16:12:01+5:30
आजारी व्यक्तीने प्रसाद बनवू नये...
पुणे : गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. जी मंडळे प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करतात त्यांनी एफडीए कार्यालयाकडे नोंदणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मंडळांना दिल्या आहेत.
गणेश मंडळांनी प्रसादाबाबत नियमांचे पालन करताना काय काळजी घ्यावी याबाबत एफडीए ने निर्देश दिले आहेत. यामध्ये म्हटले आहे की आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भाविकांना देण्यात यावा. तसेच शिळ्या अन्नपदार्थाचे वाटप करू नये. प्रसादाला धूळ, माती, माशा, मुंग्या आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी काळजी घ्यावी. यासाठी प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा, असेही म्हटले आहे.
आजारी व्यक्तीने प्रसाद बनवू नये-
संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळू नयेत. प्रसाद तयार आणि वाटप करणाऱ्यांनी नाक, कान, डोके, केस खाजवणे, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु, धुम्रपान करणे टाळावे. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी.
हातमाेजे व ॲप्राॅन वापरा
प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रन घालावा तसेच केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा. प्रसाद तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.
पिण्याचे पाणी झाकुन ठेवा-
पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासून व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच मांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत. कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी, या प्रकारच्या सूचना शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत.