‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:53 AM2024-01-24T07:53:00+5:302024-01-24T07:53:15+5:30

जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

With slogans like Ek Maratha Lakh Maratha, the sound of the march going towards Pune | ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे-नगर रोडवरील रांजणगाव येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील महागणपतीची आरती करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या वेळी परिसरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय... हर हर महादेव... एक मराठा, लाख मराठा.. अशा घोषणा देऊन भगवे झेंडे, भगव्या टोप्या घातलेले मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

फुलांची उधळण व एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पुणे-नगर रोडवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चाचा आवाज दुमदुमून गेला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते.

गावागावातून चपाती, शेंगदाणा चटणी

पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारपर्यंत प्रत्येक गावात महिलांमध्ये स्वयंपाकाची लगबग सुरू होती. काही गावांतून लापशी, डाळ-भात सुद्धा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचविण्यात
आला होता.

समाजाच्या प्रगतीसाठी व लेकरांच्या भविष्यासाठी शहाणपणाची भूमिका घ्यावी लागेल. आपले शरीरसुद्धा साथ देत नसताना जातीसाठी, समाजासाठी जिवाची पर्वा न करता आंदोलन करत असून, पुणेकरांनी आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातील लढाईसाठी मोठ्या संख्येने मुंबईत यावे व मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी. - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाचे नेते

‘जात पडताळणी’ अध्यक्षांविना 
जळगाव : १८ जिल्ह्यांमध्ये जात पडताळणी समितीचा कारभार अध्यक्षांविना सुरू आहे. एकीकडे अतिरिक्त पदभाराच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे तर दुसरीकडे लाखों ‘कुणबी’ दाखल्यांचे वाटप सुरू झाले आहे. वैधतेशिवाय दाखल्यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे समितीची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

Web Title: With slogans like Ek Maratha Lakh Maratha, the sound of the march going towards Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.