प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पित्याचा मुलीने आई अन् प्रियकराच्या मदतीने काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:34 PM2023-06-06T13:34:37+5:302023-06-06T13:34:53+5:30
पोलिसांनी तब्बल 230 सीसीटीव्ही तपासून उघडकीस आणला एक भयंकर कट
पुणे/किरण शिंदे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जूनच्या सकाळी संपूर्ण जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तब्बल 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. आणि त्यानंतर उघडकीस आला एक भयंकर कट. एका महिलेने मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने या व्यक्तीचा खून केला. मात्र हा संपूर्ण कट पोलिसांनी उघडकिस आला.
अग्नेल जॉय कसबे (वय 23, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय 43, गुड विल वृंदावन, आनंद पार्क, वडगाव शेरी) आणि एका अल्पवयीन मुलीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. जॉन्सन कॅजिटन लोबो असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अग्नेल कसबे आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. त्याचे आरोपी सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध होते. मात्र जॉन्सन याला हे प्रेम संबंध मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात भांडण व्हायचे. या भांडणाला वैतागून आरोपी महिला आणि तिच्या मुलीने एक भयंकर कट रचला. यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या क्राईम आणि वेब सिरीज पाहिल्या. आणि 30 मे च्या रात्री जॉन्सन याचा खून केला.
30 मे च्या रात्री जॉन्सन घरात गाढ झोप येत असताना आरोपींनी डोक्यात वरवंटा मारून आणि मानेवर चाकूने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर एक दिवस त्यांनी त्याचा मृतदेह घरातच ठेवला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी मृतदेह एका व्हॅगनार गाडीत घालून सणसवाडी जवळील एका मोकळ्या मैदानात पेट्रोल टाकून जाळून टाकला. आणि त्यानंतर काही झालेच नाही अशा आविर्भावात ते वावरत होते.
जॉन्सन याची पत्नी असलेल्या आरोपी सॅन्ड्रा हिने खून झाल्याचे कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी पतीचा फोन सुरूच ठेवला. ती दररोज त्याचे व्हाट्सअप स्टेटस बदलायची. चार जून रोजी आरोपी महिलेचा वाढदिवस होता. तिने पतीच्या मोबाईल वरून स्वतः आपल्याच वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये म्हणून त्यांनी या सर्व युक्त्या वापरल्या. मात्र पोलिसांनीही कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
अनोखी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक व्हॅगनार कार संशयास्पदरित्या दिसून आली. त्यानंतर त्यांनी 233 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ही कार शोधून काढली. घटनेच्या दिवशी ही कार आरोपी अग्नेल चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता ते सर्व सत्य समोर आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, पोलीस कर्मचारी जितेंद्र पानसरे जनार्धन शेळके अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर शिवणकर, चंद्रकांत काळे, सचिन होळकर यांच्या पथकाने केली.