तो सूट घेऊन यान सूर्याकडे झेपावले; १० वर्षांच्या परिश्रमानंतर पुण्यात बनला आदित्य एल-१ चा ‘सूट’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:36 PM2023-09-03T13:36:01+5:302023-09-03T13:36:53+5:30
सूटच्या माध्यमातून सूर्याच्या अतिनील तरंग लांबीचे फोटो घेऊ शकू, जे इतर कोणत्या देशाने केलेले नाही
पुणे : सूर्यावर नेमकं चालतंय काय, तिथं कसल्या हालचाली होतात, त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, याविषयीचे गूढ आता उलगडेल. कारण ‘आदित्य एल१’ हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी निघाले असून, त्यातील एका (solar Ultravailet telescope) ‘सूट’ची निर्मिती पुण्यातील आयुका संस्थेत झाली आहे. जवळपास ९-१० वर्षे यावर काम झाले आहे. या सूटवर काम करणारे अभियंते भूषण जोशी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
जोशी म्हणाले, ९ वर्षांपूर्वी आमच्याकडे एक प्रस्ताव आला की, आदित्य एल-१ साठी एक उपकरण तयार करायचे आहे. त्यावर काम सुरू केले. कोरोनात पहिले टेस्टिंग झाले. त्यासाठी आयुकात (आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र) ‘क्लिन रूम’ तयार केली होती. आम्ही डिझाइन केल्यानंतर त्याचे लॅब टेस्टिंग झाले. नंतर क्वाॅलिफिकेशन माॅडेल आणि मग फ्लाइट माॅडेल बनवले गेले. आम्ही बनवलेल्या सूटवर इस्रोतही प्रयोग झाले. खूप तापमानाचा दाब, गुरुत्वाकर्षणाचा दाब, व्हायब्रेशन आदींचे प्रयोग त्यावर करण्यात आले. तयार केलं आणि पाठवलं असं होतं नाही. खूप टेस्टिंग होतात. अखेर आज आम्ही बनवलेला सूट घेऊन यान सूर्याकडे झेपावले आहे. यानात ७ विविध सूट म्हणजे उपकरणे आहेत. ती जेव्हा पहिला फोटो काढून पाठवेल तेव्हा सोनेरी आनंदाचा क्षण असेल.
आयुकातील प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी ‘इस्रो’च्या सहकार्याने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपची (सूट) निर्मिती केली आहे. त्यात अभियंता म्हणून भूषण जोशी यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. तसेच अक्षय कुलकर्णी, अफाक, प्रवीण चोरडिया, महेश बुरशे, अभय कोहक, शाक्य सिन्हा आदींनी काम केले आहे.
एल-१ या बिंदूपर्यंत जाऊन तेथून सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणे आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. एल १ हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे. तिथे सूर्याची आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण समपातळीवर आहे. तिथे हे यान थांबून सूर्यावर लक्ष ठेवणार आहे. हे यान पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती फिरणार आहे. त्यामुळे आपल्याला २४ तास सूर्यावर काय हालचाल होत आहे, ते समजेल.
तो खूप मोठ्या आनंदाचा क्षण
मी जवळपास नऊ वर्षे ‘आदित्य-एल-१’च्या ‘सूट’ उपकरणावर काम केले आहे. पण, जेव्हा हे यान ११० दिवसांनी पहिल्यांदा सूर्याचे फोटो पाठवेल, तेव्हा खऱ्या अर्थाने कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल. तो खूप मोठ्या आनंदाचा क्षण असेल. - भूषण जोशी, ‘सूट’ उपकरणाचे अभियंता, आयुका, पुणे
क्लीन रूम कशासाठी?
हे उपकरण करताना क्लीन रूम लागते. म्हणजे एक घनमीटरमध्ये ४०-५० लाख धूलिकण असतात. तर आम्ही केवळ १०० धूलिकण असतील एवढ्या क्लीन रूममध्ये काम केले. हे धूलिकण आम्ही मोजायचो, त्यासाठी मशीन होती. इस्रोने आम्हाला रूमसाठी जागा दिली होती, तिथे उपकरण तयार केले, असे जोशी म्हणाले.
वेगळेपण काय ?
सूर्याकडून अतिनील किरणं पृथ्वीवर येतात; पण, ओझोनच्या थरामुळे त्यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे सूर्याचे फोटो तंतोतंत येत नाहीत. म्हणून ओझोन थराच्या वर जाऊन आपण ते फोटो घेणार आहोत. सूर्याची अतिनील तरंग लांबीचे फोटो घेऊ शकू, जे इतर कोणत्या देशाने केलेले नाही. तिथे अमेरिका, युरोप आणि जपानचे उपग्रह आहेत; पण, आपले हे वैशिष्ट्य असणार आहे.
सूर्यावरील सौरज्वाळांचे कण पृथ्वीवर फेकले गेल्याने धोका निर्माण होतो. म्हणून आपण त्या ज्वाळांचा अभ्यास करणार आहोत. ते आपल्याकडे फेकले जाण्यापूर्वी आदित्य एल-१ त्यांचे आपोआप फोटो घेईल. त्याने आपल्याला समजेल की, तिथे सौरज्वाळांचा स्फोट होत आहे.