मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती माेर्चाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 03:25 PM2018-07-29T15:25:13+5:302018-07-29T15:27:02+5:30
मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला.
पुणे : मराठा अारक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी अांदाेलन करण्यात अाले. अाैरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुण कार्यकर्त्यांने गाेदावरी नदीत उडी घेत जलसमाधी घेतली. या घटनेनंतर मराठा क्रांती माेर्चाचे अांदाेलन अधिक तीव्र झाले. राज्यात काही ठिकाणी या अांदाेलनाला हिंसक वळण लागले. यावेळी अनेक मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात अाले. या अांदाेलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी अाज पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत माेर्चा काढण्यात अाला. यावेळी शेकडाे माेर्चेकरी सहभागी झाले हाेते.
सकाळी 11 च्या सुमारास शेकडाे कार्यकर्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र अाले. संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून माेर्चाला सुरुवात करण्यात अाली. माेर्चा जसा पुढे सरकत हाेता त्याप्रमाणे जंगली महाराज रस्ता बंद करण्यात येत हाेता. महिलांसह शेकडाे मार्चेकरी भगवे झेंडे घेऊन या माेर्चात सहभागी झाले हाेते. जंगली महाराज रस्त्यावरुन माेर्चा महानगरपालिकेच्या दिशेने पुढे जात शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या माेर्चाची सांगता करण्यात अाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा माेर्चा काढण्यात अाला. यावेळी मराठा कार्यकर्त्यांवरील खाेटे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी करण्यात अाली. त्याचबराेबर शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, मराठा समाजाला अारक्षण मिळायला हवं अशीही मागणी यावेळी करण्यात अाली. त्याचबराेबर विविध घाेषणाही यावेळी देण्यात अाल्या. माेर्चा संभाजी उद्यानाजवळ येताच माेर्चेकरांनी संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणीही यावेळी केली.
शिवाजीनगर येथे माेर्चा अाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात अाला. काकासाहेब शिंदे या जलसमाधी घेतलेल्या मराठा अांदाेलकाला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात अाली. त्याचबराेबर माेर्चाच्या मागण्यांचे निवेदन वाचण्यात अाले. काही काळासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या अांदाेलन करुन राष्ट्रगीताने या अांदाेलनाची सांगता करण्यात अाली.