धनगर आंदाेलकांवरील गुन्हे मागे घ्या ; गाेपिचंद पडळकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 06:45 PM2019-12-04T18:45:39+5:302019-12-04T18:48:15+5:30
धनगर आरक्षणासाठी आंदाेलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी गाेपिचंद पडळकर यांनी केली आहे.
पुणे : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आरे आंदाेलकांवरील गुन्हे मागे घेतले. तसेच नाणार रिफायनरी विराेधात आंदाेलन करणाऱ्यांवरील गुन्हे देखील तातडीने मागे घेण्यात आले. आता काेरेगाव भिमा घटनेच्या अनुषंगाने दलित आंदाेलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती राष्ट्रवादीकडून मुख्यंमत्र्याकडे करण्यात आली आहे. त्यातच आता धनगर आरक्षणासाठी आंदाेलन करणाऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते देखील मागे घेण्यात यावेत अशी मागणी धनगर नेते गाेपिचंद पडळकर यांनी केली आहे. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी बाेलताना ही मागणी केली.
गाेपिचंद पडळकर म्हणाले, राज्यामध्ये धनगरांना एसटी वर्गाच्या अंतर्गत आरक्षण मिळावं यासाठी अनेक नेत्यांच्या नेतृत्वात आंदाेलने झाली आहेत. या आंदाेलनांच्या दरम्यान अनेक आंदाेलकांवर केसेस दाखल झाल्या आहेत. सामाजिक विषयांवर आंदाेलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्यामुळे त्यांना अनेक वर्ष काेर्टात जावे लागत आहे. त्यामुळे आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी आहे की आमच्या समाजातील ज्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या आहेत त्या लवकरात लवकर मागे घेण्यात याव्यात.
धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे अशी आमची जुनी मागणी आहे. येत्या काळात आम्ही राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहाेत, त्यात आरक्षणाबाबत पुढचे धाेरण ठरविणार आहाेत. तसेच ज्या आंदाेलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची माहिती घेऊन ते गुन्हे मागे घेण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार आहाेत. असेही ते यावेळी म्हणाले.