वीज खंडितचा आदेश मागे घ्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:54+5:302021-06-25T04:08:54+5:30
नारायणगाव : स्ट्रीट लाईटची थकीत वीजबिले न भरणाऱ्या शिरोली बुद्रुक आणि बारव येथील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणने खंडित ...
नारायणगाव : स्ट्रीट लाईटची थकीत वीजबिले न भरणाऱ्या शिरोली बुद्रुक आणि बारव येथील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने विद्युत पुरवठा खंडित करण्याचा काढलेला आदेश दोन दिवसांत मागे घ्यावा, अन्यथा जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तीव्र आंदोलन करतील, वेळप्रसंगी महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी दिला आहे.
महावितरण विभागाने थकबाकी वसुली मोहीम तीव्र केली असून, नुकताच सर्व ग्रामपंचायतींना थकबाकीचे पत्रक काढून थकबाकी न भरल्यास स्ट्रीट लाईट मीटर कनेक्शन बंद करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतीच्या ४० टक्के ही महसूल वसूल नाही आणि जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र असताना विद्युत पुरवठा खंडित करण्याचा काढलेला आदेश काढून शिरोली बुद्रुक आणि बारव येथील स्ट्रीट लाईटचा पुरवठा खंडित केल्याने जुन्नर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचानी तीव्र संताप व्यक्त करीत वारूळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बैठक घेऊन महावितरण विभागाच्या आदेशाचा निषेध केला.
या वेळी विघ्नहरचे संचालक संतोष खैरे,पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, शिरोली बुद्रुकचे सरपंच प्रदीप थोरवे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, वडज सरपंच सुनील चव्हाण, गुंजाळवाडीचे सरपंच रमेश ढवळे, आशीष माळवदकर यांच्या जुन्नर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.
आशा बुचके म्हणाल्या की, आम्ही स्ट्रीट लाईटचा एक रुपयाही भरणार नाही, प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीज पुरवठा बंद करू नये असे पुणे जिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय झाला असताना महावितरण विभाग वीज पुरवठा खंडित करीत असेल तर हे खपवून घेणार नाही. रस्ता पेठेतील महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहोत. दोन गावे सोडून एकही ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केला तर खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
संतोष खैरे म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगातून वीजबिल भरा म्हणतात, एकीकडे द्यायचे आणि दुसरीकडे काढून घ्यायचे असा अजब निर्णय शासनाचा आहे, अशी टीका करत महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला.
योगेश पाटे म्हणाले की, महावितरण अधिकाऱ्यांनी वीज तोडून दाखवावी, तिथे वीज तोडतील तिथे अधिकाऱ्यांना बांधून ठेवणार असा इशारा दिला.
अर्चना उबाळे म्हणाल्या की, आज वटपूजन असताना वडाच्या झाडाऐवजी लाईटच्या पोलला फेऱ्या माराव्यात अशी परिस्थिती महावितरणमुळे निर्माण झाली आहे.
यावेळी सरपंच कडलक , महेश शेळके , वैशाली तांबोळी, नायकोडी , सविता गायकवाड , हर्षल गावडे , प्रदीप थोरवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
२४ नारायणगाव बैठक
महावितरण विरोधात आयोजित बैठकीत बोलताना आशा बुचके.