"गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे मागे घ्या..." आमदार रवींद्र धंगेकरांची विधानभवन परिसरात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:33 PM2023-12-15T16:33:45+5:302023-12-15T16:34:15+5:30
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात याव्यात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले...
नागपूर/पुणे :नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज विधानभवन परिसरात कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार निदर्शने केली. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात याव्यात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले.
गणेशोत्सव काळात पुणे शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी नागपूर अधिवेशनात शुक्रवारी सकाळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हातात फलक घेत निदर्शने केली. त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीतील आमदारांनी यावेळी पाठींबा दर्शवला.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करा, असे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सवकाळातील ५ दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगीही सरकारने दिली होती. असे असताना या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही कारवाई पूर्णतः चुकीची आहे.
गुन्हे दखल करण्यात आलेल्यांमध्ये अनेक तरुण आहेत. त्यांच्यावर गुन्हे दखल केले तर त्यांना नोकरी मिळणार नाही. उच्च शिक्षणात त्यांना अडचणी येतील. आधीच बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. सरकारने जाहीर केलेल्या नियमात राहून या तरुणांनी उत्सव साजरा केला आहे. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत. ते त्वरित मागे घेण्यात यावेत. तरुणांच्या भविष्याचा, त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारने संवेदनशील राहून निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.