पर्सचोरीबरोबर बँक खात्यावरही डल्ला : डायरीत पिन नंबर लिहिल्याने चोरट्याचे फावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:47 PM2018-09-18T21:47:11+5:302018-09-18T21:49:53+5:30
आपल्या बँकेचा एटीएम पिन नंबर कोणालाही सांगू नका अथवा कोठे लिहून ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते़. चोरट्याने त्या कार्डचा व डायरीतील पिन नंबरचा वापर करुन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले़.
पुणे : आपल्या बँकेचा एटीएम पिन नंबर कोणालाही सांगू नका अथवा कोठे लिहून ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते़. पण, ते लक्षात न घेतल्याने गणपती मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्या महिलेची चोरट्याने पर्स लंपास केली व त्यातील डायरीतील पीन नंबरवरुन कार्डाच्या सहाय्याने एटीएममधून ४७ हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.
याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव तालुक्यातील एका ४८ वर्षांच्या महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना तुळशीबाग गणपती परिसरात १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला कुटुंबियांसह गणपती देखावे पाहण्यासाठी पुण्यात आल्या होत्या़. तुळशीबागेत झालेल्या गदीर्चा गैरफायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या मोठ्या पर्समधील लहान पर्स लांबविली़. त्यांच्या पर्समध्ये ५ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व वैयक्तिक डायरी होती़ . या डायरीमध्ये त्यांनी एटीएम पिन नंबर लिहून ठेवला होता़. चोरट्याने त्या कार्डचा व डायरीतील पिन नंबरचा वापर करुन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले़. पुढील तपास पोलीस निरीक्षक ए़ जी़ मराठे करत आहेत़.