Pune Crime: महिन्याभरात 'त्याने' चोरले दीड कोटींचे खानदानी दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 09:05 AM2022-10-31T09:05:12+5:302022-10-31T09:08:03+5:30
दरोडाविरोधी पथकाने आरोपीला अटक केली...
पुणे : गेल्या ७ वर्षांपासून तो त्यांच्या घरी काम करीत होता. त्यामुळे घरातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण, त्याला मोह सुटला. त्याने ऑक्टोबर महिन्यात ४ ते ५ वेळा कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून तब्बल १ कोटी ५९ लाख १० हजार ६०० रुपयांचे जुने खानदानी दागिने चोरले. लक्ष्मीपूजनासाठी या कुटुंबाने बेडरूममधील कपाटातून दागिने काढले, तेव्हा चोरीचा हा प्रकार समोर आला. दरोडाविरोधी पथकाने या नोकराला अटक केली आहे.
चंदू बालाजी मेेंडेवाड (वय ३६, रा. नांदेड) असे या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदनगर येथील सुजय गार्डनमध्ये राहणाऱ्या सराफी व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू मेंडेवाड हा गेल्या ७ वर्षांपासून त्यांच्या बंगल्यात साफसफाईचे काम करतो.
सराफांनी त्यांचे खानदानी दागिने बेडरूमच्या कपाटात ठेवले होते. त्याने बनावट चाव्यांचा वापर करून हिऱ्याचे दागिने, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ अशा मौल्यवान वस्तू एक-एक करीत महिन्याभरात ४ ते ५ वेळा लांबविल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरीचा हा प्रकार लक्षात आला. याची माहिती मिळाल्यावर दरोडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चंदू मेंडेवाड याला पकडले. अधिक तपासासाठी न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.