Raksha Bandhan: महिन्यातच पती, मुलगा गेला; नातेवाइकांनी छळलं अन् भावाने जगवलं!
By नितीन चौधरी | Published: August 11, 2022 02:38 PM2022-08-11T14:38:32+5:302022-08-11T14:39:48+5:30
कोंढव्यातील नाजनीन शेख या सर्वस्व गमावलेल्या बहिणीला हेरंब कुलकर्णी नावाच्या भावाची साथ
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत पती गेला. कर्ता माणूस गेल्याने दोन लेकरांना घेऊन कसं जगायचं हा प्रश्न उभा ठाकला. त्यातून सावरल्यावर वर्षभरातच १३ वर्षांचा मुलगा अगम्य आजारानं गेला. आता का जगावं, असा प्रश्न असतानाच नातेवाईकही छळायला लागले. जगायचं नाही असं ठरवलं; पण एका भावानं खंबीर साथ दिली. त्यानंच जगण्याची उभारी दिली. ही दर्दभरी कहाणी आहे कोंढव्यातील नाजनीन शेख यांची. कोरोनानं सर्वस्व गमावल्यानंतर हेरंब कुलकर्णी या भावानं खऱ्या अर्थानं रक्षाबंधनाची भेट दिली. आता ती तिच्या पायावर उभी होत आहे.
‘सर, मेरा ब्यूटिपार्लर आज चालू हो गया..’ असा मॅसेज हेरंब कुलकर्णी यांच्या फाेनवर आला आणि नानजीनच्या फोननं आणखी एका बहिणीला जगण्याची उमेद दिल्याची भावना कुलकर्णी यांना वेगळे बळ देऊन गेली. नाजनीनला मदत करण्यासाठी अनेक संकटं आली; पण तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी अनेक भावांनी हात पुढे केले. तिच्यासाठी ही रक्षाबंधनाची भेट असल्याचं सांगताना कुलकर्णी यांना भरून आलं होतं.
नाजनीनच्या पतीचं कोरोनाच्या पहिल्या लाटेत निधन झालं. तिचे पती शिवाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या शेजारी कायद्याची पुस्तकं विक्री करायचे. त्यांच्या अचानक जाण्याने नाजनीनला तिच्या दोन मुलांसह घर कसं भागवायचं याची चिंता पडली हाेती. ती आधीपासून ब्यूटिपार्लरचा व्यवसाय करायची; पण तुटपुंज्या सामग्रीत ते फारसं चालत नव्हतं. नवऱ्याचा व्यवसायही खाऊन-पिऊन भागेल इतकाच होता. त्यामुळं नवरा गेल्यावर तिची परिस्थिती हालाखीची झाली होती. दोन्ही मुलांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न होता. तेव्हा कोरोना एकल विधवा समितीच्या हेरंब कुलकर्णी यांनी तिला आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, लहान मुलानं पाय गळाल्याची तक्रार केली आणि एकाच रात्रीत तो अंथरूणाला खिळला, त्याचं शरीर पूर्ण अधू झालं. त्याची तब्येत अधिकच बिघडली. एका रुग्णालयात दाखल केलं. तिथंही नेमकं काय झालं ते कळलं नाही. तिथून दुसऱ्या रुग्णालयाचा आधार घेतला; पण महिन्यातच मुलगा गेला. एका वर्षात नाजनीनला दुसरा मोठा झटका बसला. ती पूर्ण कोसळली, आता जगायचं कशासाठी असं तिला वाटू लागलं. त्यातच नवऱ्यानं घेतलेल्या कर्जासाठी बँकेचा ससेमिरा थांबत नव्हता. नातेवाइकांनी त्रास द्यायला सुरू केला. मात्र, तिच्यासाठी तिच्या मानलेल्या भावानं हार मानली नाही. नाजनीनला ब्यूटिपार्लरसाठी मदत उभारण्यासाठी प्रयत्न केेले.
कुलकर्णी यांनी आवाहन करतात पुण्याचे विक्रम देशमुख, टाटा मोटर्सचे अलिफ शेख यांचा ग्रुप व मुंबईच्या चारुता मालशे यांनी मिळून ७३ हजारांची मदत केली. आता तिचे ब्यूटिपार्लर सुरू झाले आहे. नवरा गेल्यानंतर वडील आधार होते; पण ते ७५ वर्षांचे, ते कसे सांभाळणार, त्यात आम्ही पाच बहिणी, माझा मोठा मुलगा बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षाला. त्यामुळे कुलकर्णी हे माझ्यासाठी देवदूतच ठरले. त्यांच्यामुळे मला धीर आला. त्यांचा चेहरा पाहून मी उभी राहू शकले. त्यांच्या आधारामुळे मी आता जगेल. माझ्या मुलाला पीएच.डी करायची इच्छा आहे. या व्यवसायातून त्याची इच्छा पूर्ण करायची आहे.
''नाजनीनला अजून भेटलोही नाही; पण असे भावबंध तयार झालेत की त्यांचे आनंद आणि दुःख आमचे कधी झाले हे कळलेच नाही. तिला दिलेली ही रक्षाबंधनाचीच भेट आहे, असं वाटतं. - हेरंब कुलकर्णी''