काेराेनाशी लढण्यासाठी काही तासात पुणे महापालिकेने उभारले 150 खाटांचे रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 01:38 PM2020-03-10T13:38:26+5:302020-03-10T13:39:25+5:30
काेराेनाची लागण झालेले दाेन रुग्ण पुण्यात आढळल्याने महापालिकेकडून काही तासात 150 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
पुणे : दुबईहून आलेल्या प्रवाशांपैकी दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यावर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहिम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या दोघांना महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड रस्त्यावरील राजयोग सोसायटी आणि सणस मैदानावरील एका इमारतीमध्येही दोन विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. पालिकेने रात्रीतून १५० खाटांची दोन रुग्णालये उभारली असून दुपारनंतर ही रुग्णालये सुरु केली जाणार आहेत.
या दोन इमारतींमध्ये सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये दोन बाधित प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचे विलगीकरण केले जाणर आहे. पालिकेने डॉक्टरांचे पथक व अनुषंगिक यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सिंहगड रस्त्यावरील राजयोग सोसायटीमध्ये ५० खाटांचे तर सणस मैदानावरील इमारतीमध्ये १०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.
डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांसोबत ४० जणांचा गट दुबईला सहलीकरिता गेला होता. खासगी टुर्सच्या माध्यमातून गेलेले हे प्रवासी एक मार्च रोजी पुण्यात परतले. कोरोनाच्यादृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या देशात यादीत दुबई नसल्याने या प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली नव्हती. यातील दोघांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये ५० वर्षीय पुरुष आणि ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाद्वारे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित व्यक्ती आढळून येतात किंवा कसे याची पडताळणी करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. यासोबतच नागरिकांनी खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.