पुढील ४८ तासांच्या आत लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्यांचा ताबा शहर पोलिसांच्याकडे जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:04+5:302021-03-18T04:11:04+5:30
ही दोन्ही पोलीस ठाणी आहे त्या स्थितीत शहर पोलीस दलात सामाविष्ट करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने उरुळी कांचन व ...
ही दोन्ही पोलीस ठाणी आहे त्या स्थितीत शहर पोलीस दलात सामाविष्ट करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने उरुळी कांचन व वाघोली ही दोन नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अंधातरी लटकल्याचे निदर्शनास येत आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून काही महिन्यांपूर्वी पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. अखेर शासनाने ही दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलात घेण्याबाबत अंतिम आदेश जारी केला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता - काळेपडळ, खराडी, नांदेड सिटीसह शहर पोलीस दलात आणखी कांही स्वतंत्र पोलीस ठाणी सुरु होणार आहेत.
याबाबतचे प्रस्ताव यापूर्वीच शासन दरबारी पाठवले असून, वरील चार पोलिस ठाणी सुरू करण्याबाबतचा आदेशही कांही दिवसात मिळण्याची अपेक्षा आहे. तर लोणी काळभोर व लोणी कंद या दोन्ही पोलीस ठाण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिल्याने, वरील दोन्ही पोलीस ठाण्यांचा कारभार शहरातून सुरु होणार आहे.
--
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून उरुळी कांचन तर लोणीकंद पोलीस ठाण्यातून वाघोली ही दोन नियोजित पोलीस ठाणी सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. मात्र लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन्ही पोलीस ठाणी सध्या आहे त्याच स्थितीत शहरात समावेश करण्याबाबतचा आदेश शासनाकडून आलेला आहे. यामुळे वाघोली व उरुळी कांचन येथे सध्या तरी नव्याने पोलीस ठाणी निर्माण होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. मात्र पुढील काळात राज्य शासनाकडून ही दोन्ही पोलीस ठाणी सुरू करण्याबाबत आदेश मिळताच ती सुरू करण्यात येणार आहेत.
डॉ. अभिनव देशमुख
पोलीस अधीक्षक
-----
पूर्व हवेलीमधील नागरिकांच्या मागणीनुसार उरुळी कांचन व वाघोली ही दोन्ही नियोजित स्वतंत्र पोलीस ठाणी सुरू करण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. याबाबतचा निर्णयही झालेला आहे. मात्र कोरोनामुळे याबाबतचा अंतिम आदेश आलेला नाही. मात्र पुढील दोन महिन्यांतच ही दोन्ही नियोजित स्वतंत्र पोलीस ठाणी सुरु करण्याबाबतचा आदेश निघण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जास्तीत प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे.
- अशोक पवार ,
आमदार