पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 12:15 PM2019-01-01T12:15:05+5:302019-01-01T22:14:53+5:30
यापूर्वी वाहतूकीचे नियम मोडला तर त्या नियमभंगाबरोबरच विना हेल्मेटचा दंड केला जात होता़.
पुणे : शहर पोलीस दलाने १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती जोरदारपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणा-या ७ हजार ४९० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात हेल्मेटसक्ती नसली तरी कारवाई करणार असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई केली आहे.
२००३ - ०४ मध्ये उच्च न्यायालयाने पुणेपोलिसांना वाहतूक सुरक्षेविषयी फटकारल्यानंतर तत्कालीन पोलीस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी एकाच दिवशी सुमारे ५ हजार दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली होती. त्यावेळी शहरात एकच गहजब माजला होता. त्यानंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून हेल्मेटविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळेपेक्षा यंदा नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये चौकाचौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत सुमारे २ हजार दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित कारवाई ही वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौकात केली आहे.
या अगोदर वाहतूक नियमांचा भंग केल्यास त्याच्याबरोबर हेल्मेटची कारवाई केली जात होती. ६ डिसेंबरपासून वाहतूक पोलिसांनी थेट हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून संपूर्ण डिसेंबर महिन्यात ३१ हजार ५५७ जणांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही दिवसात तर दररोज ३ ते ५ हजार जणांवर कारवाई करण्यात येत होती. ३१ डिसेंबरला ४ हजार ८६२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ जानेवारीला तब्बल ७ हजार ४९० जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे.
त्यातील बहुसंख्य दुचाकी वाहनचालकांकडून ईचालनमार्फत ५०० रुपये दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे़ यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे सध्या हेल्मेट वापरणा-या दुचाकीस्वारांची संख्या रस्त्यावर लक्षणीयरित्या वाढली असून अनेक चौकात सिग्नलला थांबलेल्यांमध्ये पूर्वी हेल्मेट घातलेले २ ते ३ दुचाकीस्वार दिसत असत. आता नेमके उलट चित्र दिसत असून सिग्नलला थांबलेल्यांमध्ये २ -३ दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय दिसून येतात. त्यांच्यावरही सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जात आहे.