तब्बल दोन महिन्यांपासून तळे राखणारे वेतनाविनाच
By admin | Published: May 9, 2015 03:28 AM2015-05-09T03:28:47+5:302015-05-09T03:28:47+5:30
तांत्रिक बाबीमुळे यंदा खडकवासला जलसंपदा विभागाच्या बहुसंख्य अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वेतन होऊ शकलेले नाही.
पुणे : तांत्रिक बाबीमुळे यंदा खडकवासला जलसंपदा विभागाच्या बहुसंख्य अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वेतन होऊ शकलेले नाही. त्याचा फटका तिसऱ्या, चौथ्या वर्गातील कर्मचाऱ्यांना बसला असून, हात ऊसने पैसे घेऊन संसार चालविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
जलसंपदा विभागाची अनेक कार्यालये धरणांच्या संख्येनुसार असून एका उपविभागात अंदाजे १५० ते २०० अधिकारी व कर्मचारी काम करतात. शासनाच्या कार्यपध्दतीनुसार दरवर्षी कोणती कार्यालये सुरू
ठेवायची, याचा आढावा घेतला जातो. शासनाची मान्यता घेतली जाते. याबाबतचा अहवाल शासनास सादर केला जातो. मंत्रालय पातळीवर त्यावर त्वरित निर्णय होतो. याला ‘कंटीन्युईटी’ असा शब्द या विभागात प्रचलित आहे. त्यानंतर पगार काढण्याचे काम सुरु होते.
यंदा मार्च व एप्रिल असे २ महिने ‘कंटीन्युईटी’ येण्यास विलंब झाला. त्यामुळे तितका उशीर पगार होण्यास झाला.
खडकवासला धरणसाखळी प्रणालीत ९ उपविभाग आहेत. कंटीन्युईटी न मिळाल्याने विभागातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन महिने वेतन मिळू शकलेले नाही. कृष्णा खोरे महामंडळाची स्थिती नाजूक असताना यापुर्वी ३ ते ४ महिने वेतन होऊ शकले
नव्हते. काही अधिकाऱ्यांनी खासगीत वेतनास झालेल्या विलंबाची बाब मान्य करून दैनंदिन खर्च
भागविणे अवघड असल्याची कबुली दिली. २ महिने पगार थकविणे चुकीचे असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी
व्यक्त केली.
कंटीन्युईटी आणि वेतन या धोरणात्मक बाबी असून त्यांचा निर्णय मंत्रालय पातळीवरून होत असतो. अलिकडे वेतन आॅनलाईन केले जाते. ज्या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या प्रकरणांत त्रुटी असतील त्यांचे वेतन मिळण्यास विलंब होतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.
दरम्यान, खडकवासला जलसंपदा विभागाची कंटीन्युईटी २ दिवसांपुर्वी आली असून पगार काढण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)