चार महिन्याच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:46+5:302020-11-22T09:37:46+5:30
अरूणा राजेंद्र पवार (वय ३६ रा. साईनाथ नगर सारथी शाळेजवळ समाधान हॉटेल मागे, मुंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे ...
अरूणा राजेंद्र पवार (वय ३६ रा. साईनाथ नगर सारथी शाळेजवळ समाधान हॉटेल मागे, मुंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. शहरात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस वर्षीय फिर्यादी महिला लोणी (प्रवरा) जि. अहमदनगर येथे वास्तव्यास आहे. तिचे पतीशी भांडण झाले होते. त्यामुळे नवऱ्याविरूद्ध लोणी (प्रवरा) पोलीस ठाणे येथे तिने तक्रार दिली. मात्र घरी न जाता तिच्या चार महिन्याच्या बालिकेसह साताऱ्याला जाण्यासाठी तिने लोणी बस स्टँड गाठले. धुळे-सातारा बसमध्ये ती बसली.
बस पुणे मार्गे साताराकडे जात असताना त्याच बसमध्ये एक अनोळखी महिला तिच्या शेजारी बसली होती. बसमध्ये दोघींची चांगली ओळख झाली. ती अनोळखी महिला तिच्या बाळाला देखील खेळवू लागली. फिर्यादी महिलेने तिला सर्व हकीकत सांगितली. तिची सहानुभूती मिळवून महिलेने तिला पतीबरोबर न राहाण्याचा सल्ला देत तिला पुणे येथे उतरण्यास प्रवृत्त केले. तिला साडेसात वाजता हडपसर याठिकाणी आणले. फिर्यादी महिलेला भूक लागल्याने चायनीज सेंटरवर महिलेला जेवण दिले. ती जेवण करीत असताना तिची नजर चुकवून तेथून मुलीला घेऊन अंधारात पळून गेली.
फिर्यादी महिलेने आसपास बाळ आणि महिलेचा शोध घेतला मात्र कोणताही ठावठिकाणा न लागल्याने महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी स्थानिक लोकांशी संवाद साधल्यानंतर महिला मांजरी परिसरातील साई समर्थ सोसायटी फ्लँट नं १०३ मांजरी बुद्रुक येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी जाऊन महिलेला ताब्यात घेतले असता तिनेच बाळाला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या महिलेला अटक करण्यात आली.
------------------------------------------------------------------------