जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्या महिलेला तामिळनाडूतून केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 02:53 PM2021-09-06T14:53:59+5:302021-09-06T14:54:06+5:30
घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते.
पुणे : घरकाम करणार्या महिलेने ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणामधून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरुन नेली होती. या महिलेला वानवडी पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली आहे.
शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडू) असं या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्यांच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते. त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करत होती. घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते. तिने ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणातून महिला आणि त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते. त्यानंतर ती तामिळनाडूला आपल्या गावी पळून गेली होती. वानवडी पोलिसांनी तामिळनाडू येथे जाऊन तिला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करत आहेत.