महिलेने अंतर्वस्त्रातून आणले ३ किलो सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:23 PM2018-05-03T23:23:47+5:302018-05-03T23:25:30+5:30
जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या महिलेकडून तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजार रुपयांचे ३ किलो ४१ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने गुरुवारी पकडले.
पुणे : जेट एअरवेजच्या विमानाने आलेल्या महिलेकडून तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजार रुपयांचे ३ किलो ४१ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने गुरुवारी पकडले.
रेहना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) या महिलेला अटक केली आहे. तिने हे सोने अंगातील अंतर्वस्त्रांमध्ये लपवून आणले होते.
याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी आलेले जेट एअरवेजच्या विमानातून रेहना खान या उतरल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांनी अंगात अंतर्वस्त्रांमध्ये सिंथेटिक रबर पेस्टच्या आत सोने लपविल्याचे लक्षात आले, अशी सहा पॅकेट आढळून आली. त्यातील सोने बाजूला काढल्यानंतर ते २४ कॅरेट चे ३ किलो ४१ ग्रॅम इतक्या वजनाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याची किंमत ९८ लाख ८३ हजार २५० रुपये असून ते जप्त करण्यात आले आहे.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपल्याला हे शाहिन नावाच्या एकाने दिले असून पुणे विमानतळावर त्यांचा माणूस ते घेण्यासाठी येईल, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेहना खान यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील कॅम्प भागातून एकाकडून ८९० ग्रॅम नार्कोटिक्स जप्त केले आहे.