राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात महिला दरीत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 06:16 PM2022-04-23T18:16:50+5:302022-04-23T18:39:02+5:30
अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांची मोठी धावपळ...
मार्गासनी (पुणे) : किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात झालेल्या धावपळीमध्ये पुणे येथील एका 28 वर्षीय महिला दरीत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही नसरापूर येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल ( 22 एप्रिल ) किल्ले राजगडावर यश बापू घागरे( वय 17 )अक्षय मधुकर पवार (वय 30) सागर दिनेश वराट (वय 30 ) तसेच रोहिणी सागर वराट (वय 28) सर्व राहणार भुमकर चौक वाकड, पुणे हे येथे मुक्कामी आले होते. आज सकाळी संपूर्ण किल्ला पाहत असताना किल्ले राजगडावरील सुवेळा माचीकडून राजसदरकडे येत असताना अचानक याठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पर्यटकांची पळापळ झाली. या पळापळीमध्ये रोहिणी सागर वराट (वय 28) पाय घसरून 100 फूट खोल दरीत कोसळल्या.
दरीत कोसळल्यामुळे या महिलेला डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली आहे. किल्ल्यावर असलेले पर्यटक रोहित जाधव अभिषेक जंगले वैभव गोरे व रेस्क्यू टीममधील रोहन देवरे शुभम भोजने यांनी सदर महिलेला दरीतून बाहेर काढले व किल्ल्यावरून खाली आणण्यास मदत केली. औदुंबर आडवाल, ज्ञानदीप धिवार, वैजनाथ घुमरे, ज्ञानेश्वर शेडगे, संतोष पाटोळे आधी टीमने रुग्णवाहिकेच्या मदतीने या महिलेस व मधमाशा चावलेल्या पर्यटकांना नसरापूर येथील डॉक्टर सूर्यवंशी हॉस्पिटल याठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तत्परता दाखवत या महिलेवर उपचार केले आहेत. वेळेत दवाखान्यात आणल्याने या महिलेचे प्राण वाचले असे यावेळी डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितले.