कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू; टाकळी हाजी आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:59 AM2023-05-19T09:59:29+5:302023-05-19T09:59:39+5:30
मलठण /शिरूर ( पुणे ) : टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना एका महिलेचा दुर्देवी ...
मलठण /शिरूर (पुणे) : टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टाकळी हाजी (ता शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रिया सुरू असताना रेखा अर्जुन हिलाळ (वय २८) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे व पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी केली आहे.
याबाबत टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांनी सांगितले की, टाकळी हाजी केंद्रातील ४२, तर कवठे केंद्रातील ३८ अशा ८० महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. डॉ. शिवाजी गजरे यांनी शस्त्रक्रिया केल्या. रेखा हिलाळ ही कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रामधील असून, त्यांची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑपरेशन टेबलवर घेतले. त्यांची तब्बेत एकदम ठणठणीत होती; मात्र शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या घाबरल्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खाली घेतले व पुढील उपचारासाठी शिरूरला पाठविले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
रेखा हिलाळ यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे आरोग्य खात्याच्या सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे रेखा हिलाळ या कवठे येमाई आरोग्य केंद्रामधील असून, तेथील ३८ महिला शस्त्रक्रियेसाठी रुग्णवाहिकेने टाकळी हाजी येथे आणण्यात आल्या होत्या; मात्र कवठे येमाई येथील दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी इकडे फिरकलासुद्धा नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे तालुका वैदयकीय अधिकारी दामोधर मोरे म्हणाले. शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही मोरे यांनी यावेळी सांगितले.