Pune: महिला वनरक्षकावर ठेकेदाराचा हल्ला, वरवंड येथील घटना: तिघांवर पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 05:15 PM2024-03-02T17:15:05+5:302024-03-02T17:15:19+5:30
महिला वनरक्षकास ठेकेदारासह अन्य दोघांनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली...
वरवंड (पुणे ) : येथे वनविभागाच्या वनक्षेत्रांमध्ये बेकायदा जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू होते. ते काम रोखण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकास ठेकेदारासह अन्य दोघांनी शिवीगाळ व धक्काबुकी करत हल्ला केल्याची घटना घडली. वनरक्षक शीतल मेरगळ यांनी यवत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पोपटराव भोईटे (रा. पाटस, ता.दौंड), ढमाले व इतर एक अनोळखी व्यक्ती (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड वन परिमंडल कार्यक्षेत्रातील वनक्षेत्र (गट नं १९२२ ) मध्ये गुरुवारी (दि २९) वनरक्षक शीतल मेरगळ व वनमजूर अरुण मदने हे पेट्रोलिंग करीत असताना दुपारी ३ वाजण्याच्या आसपास वनक्षेत्रांमध्ये एक जेसीबी मशीन जलवाहिनीची चारी खोदताना निदर्शनास आली. तेथे जाऊन चारीची पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन जलवाहिनीच्या चारीचे खोदकाम काम सुरू असल्याचे दिसून आले. वनरक्षक मेरगळ यांनी काम करीत असलेल्या कामगारांना विचारणा केली असता त्यांनी ठेकेदार अमोल भोईटे यांना घटनास्थळी बोलावून घेतले.
ठेकेदार भोईटे यांना सदर खोदकामाबाबत विचारणा केली असता त्यांनी वरंवड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी असून काळ्या रंगाची जलवाहिनी ही वरवंड गावाची असून पांढरा रंगाची ही वाखारी ग्रामपंचायत गावची आहे, असे सांगितले. फक्त वरवंड गावचे जलजीवन मिशन योजना अंतर्गत पिण्याची जलवाहिनीसाठी वनविभागाची रितसर परवानगी असून तुम्ही वाखरी गावाची जलवाहिनीचे काम कसे करता त्यासाठी वाखरी गावचे जलजीवन मिशन योजनेचे काम करण्याचा वनविभागाचा परवाना आहे का? वनविभागाची एका गावासाठी परवानगी असताना दुसऱ्या गावासाठी बेकायदा काम कसे करता ते काम थांबवा, असे सांगताच अमोल भोईटे याच्यासह अन्य दोघांनी शीतल मेरगळ यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.