एसटीच्या मागील चाकाखाली सापडून महिला ठार; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 01:45 PM2022-09-12T13:45:55+5:302022-09-12T13:50:01+5:30
मंचर : एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिला बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. हा अपघात पुणे -नाशिक ...
मंचर : एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिला बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. हा अपघातपुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे सकाळी साडेअकरा वाजता झाला. शारदा निवृत्ती भोर (वय ५८, रा. आर्वी, सध्या राहणार चिंचवडे नगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर निवृत्ती भोर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. भोर हे शिवसाई कॉलनी चिंचवडे नगर, चिंचवडगाव येथे कुटुंबीयांसह राहतात. सकाळी ते आई शारदा भोर हिला घेऊन गावी तसेच मामा प्रभाकर दत्तात्रय वाईकर यांच्याकडे हिवरे येथे निघाले होते. मोटारसायकल (क्रमांक एम एच १४ डी डब्ल्यू ०६४६ )वरून दोघेही पुणे-नाशिक महामार्गावरून चालले होते. कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे उजव्या बाजूने नारायणगावकडे चाललेली एसटी बस (क्रमांक एम एच १४ बीटी ४१९५) ही वेगाने आली. एसटी बसने मोटारसायकलच्या हँडलला धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडली. मोटारसायकलवर मागे बसलेल्या शारदा निवृत्ती भोर या एसटीच्या मागील चाकाखाली सापडून त्यांच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेले. त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मयूर निवृत्ती भोर यांनी फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.