Pune: रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 20:42 IST2023-08-09T20:41:20+5:302023-08-09T20:42:48+5:30
उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही...

Pune: रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना
टाकळी हाजी (पुणे) :वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना, मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून, उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही.
पद्माबाई शेषराव काकडे (रा.मोहगव्हाण ता.कारंजा, जि.वाशिम) ही ५५ वर्षीय महिला नातेवाइकांसोबत रांजण खळगे पाहत असताना, तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र, तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठमोठे खड्डे असल्याने, ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी, असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.
महिला पाण्यात पडल्याचे पाहताच, तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले. मात्र, नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.
सोबत असलेल्या नातेवाइकांनी आरडाओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून, त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे, असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.