बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी :नागरिकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 07:53 PM2019-02-15T19:53:33+5:302019-02-15T19:56:29+5:30
बुरसेवाडी (ता. खेड) परिसरात गुरुवारी रात्री १२च्या सुमारास घराच्या बाहेरील पडवीत झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी (वय ६५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
चासकमान : बुरसेवाडी (ता. खेड) परिसरात गुरुवारी रात्री १२च्या सुमारास घराच्या बाहेरील पडवीत झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी (वय ६५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर वाडा आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात पाठविण्यात आले आहे.
चासकमान धरण परिसर, बुरसेवाडी, दरकवाडी, गुंडाळवाडी, परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू असून, बिबट्या परिसरातील कुत्रे, शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करायला मागेपुढे पाहत नाही. जानेवारी महिन्यात कडूस टोकेवाडी येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अरुण पोपट शिंदे यांच्या कोंबड्यांवर बिबट्याने हल्ला करून कोंबड्या फस्त केल्या होत्या. त्यातच गुरुवारी बुरसेवाडी येथील भागूबाई खंडू पारधी या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यत महिलेच्या तोंडाला, गळ्याला, मानेला जखमा झाल्या आहेत. भागूबाई यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. गावातील नागरिकांनी भागूबाई यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुण्यात नेण्याचा सल्ला दिला.
या घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल एन. डी. विधाते यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून, वन विभागाच्या वतीने महिलेला औषोधोपचारासाठी तातडीने २ हजार रुपये मदत देऊन पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसारात पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.