Leopard Attack: बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:34 PM2021-12-22T13:34:54+5:302021-12-22T13:35:04+5:30
दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली
पिंपरी पेंढार : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक शिवरात दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली. मंगळवारी सायंकाळनंतर सव्वा सात वाजन्याच्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हौसाबाई दत्तात्रय शिंदे (रा. शिंदेमळा बोरी बु.) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे हे दुचाकीवरून बोरी गावठानातुन रस्त्याने त्यांच्या शिंदेमळा येथील राहत्या घरी जात होते. सिद्धेश्वर मंदिराजवळ उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबटयाने अचानक दुचाकीवर झड़प मारली. या हल्ल्यात हौसाबाई शिंदे यांच्या डाव्या पायाला कड़ाडून चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळे वनपरिमंडलचे वनपाल संतोष साळूखे, वनरक्षक त्र्यम्बक जगताप व ग्रामस्थ घटनास्थळी आले. जखमी हौसाबाई शिंदे यांना उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु लस उपलब्ध न झाल्याने त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या परिसरात ऊसाचे योग्य क्षेत्र व पाण्याची उपलब्धता तसेच खाद्यास मिळणारे पाळीव प्राणी यामुळे गेली कित्येक वर्षापासून बिबटयाचा वावर आहे. काल सायंकाळी दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.