बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
By admin | Published: November 18, 2014 03:23 AM2014-11-18T03:23:10+5:302014-11-18T03:23:10+5:30
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील पांगरीतर्फे मढ गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी झाडीत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला आहे
मढ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील पांगरीतर्फे मढ गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी झाडीत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सदर महिला ठार झाल्याचा प्राथमिक आंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सखुबाई दादाभाऊ वारे (३३, ओतूर तेलदरा) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की सखुबाई वारे या बहिणीच्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी रविवारी भेंडेवाडी परिसरात गेल्या होत्या. तिथून परत येताना त्यांनी बहिणीच्या मुलाला, ‘तू पुढे जा, मी मधल्या (जंगल वाट) मार्गाने घरी कोळवाडीला जाते’ असे सांगितले. त्या पांगरी येथून पायी गेल्या. बहिणीचा मुलगा घरी आल्यानंतर सखुबाई न दिसल्याने नातेवाईक व इतरांनी डोंगर रस्त्यावर त्यांचा शोधा घेतला; परंतु त्या सापडल्या नाहीत. नतंर पाऊस व अंधार झाल्यामुळे रात्रीचा शोध थांबवून आज सकाळी परत शोधाशोध केली. या वेळी कवटधरी मंदिरामागील ओढ्यात त्यांचे कपडे व तिथेच वरील बाजूस अर्धवट खाल्लेला त्यांचा मृतदेह दिसला.
मृतदेह पाहिल्यावर
बिबट्यानेच त्यांना ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पाऊलवाटेच्या कडेला त्यांच्या बांगड्या फुटलेल्या व ओढ्यात ओढत नेल्याच्या खुणा होत्या. ठिकठिकाणी रक्ताचे डाग व बिबट्याच्या पायांचे ठसे अंधुक दिसत होते. मृतदेह वाटेपासून ओढ्याच्य दुसऱ्या बाजूला झाडीत ओढत नेला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सदर ठिकाणी ओतूर वनविभागाचे रेंजर एस.एस. रगतवान, वनरक्षक एम.एन. खताळ व रवींद्र्र गवादे यांनी पाहणी केली. ओतूर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. याबाबत महिलेच्या मृत्यूची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
खंडू रामभाऊ दिघे, बाळासाहेब सुकाळे, शैलेंद्र गायकवाड यांनी वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)