पुणे: पगार मागितल्याने अधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; विमाननगर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:03 AM2022-03-26T11:03:42+5:302022-03-26T11:07:03+5:30
तुला कामावरून काढून टाकीन, अशी धमकीही दिली
पुणे : सिक्युरिटी गार्डची नोकरी करीत असलेल्या महिलेने आपल्या अधिकाऱ्याकडे पगार अजून झाला नाही, कधी होणार, अशी विचारणा केली. त्यावर या फिल्ड ऑफिसरने या महिलेला तुझी पैशांची अडचण दूर होईल, असे बोलून अश्लील वक्तव्य करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी फिल्ड ऑफिसर रवींद्र काळे (वय ४५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विमाननगरमधील एका कंपनीच्या गेटवर १२ फेब्रुवारी रोजी घडली होती.
याप्रकणी एका ४३ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सिक्युरिटीची ड्युटी संपवून घरी जात होती. कंपनीच्या गेटवर रवींद्र काळे हा फिल्ड ऑफिसर होता. पगार कधी होणार, किती दिवस झाले अजून पगार झाला नाही, असे त्याला विचारले. त्यावर रवींद्र काळे हा फिर्यादीच्या जवळ येऊन म्हणाला, पगार उशिरा होणार आहे. माझ्याकडे दोन तास वेळ आहे. तुझी पैशांची अडचण दूर होईल, असे सांगून तिच्याबरोबर अश्लील वक्तव्य केले. त्याच्या मागणीला फिर्यादीने नकार दिल्यावर कोणाला काही सांगितले तर तुला कामावरून काढून टाकीन, अशी धमकी दिली.