अडीच तोळे सोने असलेली बॅग महिलेला परत मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:17+5:302021-07-10T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एका प्रवासी महिलेचा अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ५ हजार रक्कम असलेला ऐवज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका प्रवासी महिलेचा अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ५ हजार रक्कम असलेला ऐवज पोलिसांच्या प्रयत्नांमुळे परत मिळाला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि रिक्षाचालकाने दागिने पुन्हा पोलीस ठाण्यात आणून देत प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला.
पुणे रेल्वेस्थानक परिसरातून रिक्षा प्रवासी लीलाबाई भिडे प्रवास करत होत्या. भिडे यांच्याकडे असलेल्या पिशवीत अडीच तोळ्यांचे दागिने, रोकड आणि कपडे होते. रिक्षा प्रवासात पिशवी विसरल्याचे निदर्शनास आल्यानंतर घाबरलेल्या भिडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश सावंत, अमित बधे यांनी तातडीने पुणे रेल्वेस्थानक परिसरातील सीटीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळून पाहिले. भिडे ज्या रिक्षातून प्रवास करत होत्या. त्या रिक्षाचा क्रमांक चित्रीकरणात उपलब्ध झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) तातडीने रिक्षाचालकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक मिळवला. पोलिसांनी रिक्षाचालक इस्माइल सय्यद यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा रिक्षातून एका प्रवाशाला सोडण्यास निघालो होतो. रिक्षात एका महिलेची पिशवी विसरल्याचे निदर्शनास आले; परंतु रिक्षेत प्रवासी असल्याने लगेच पोलिसांकडे येता आले नाही, असे प्रांजळपणे रिक्षाचालकाने सांगितले. त्यानंतर शेख आणि रिक्षा पंचायतीचे बाबासाहेब कांबळे बंडगार्डन पोलीस ठाण्यात आले. त्यांनी रिक्षा प्रवासी महिला भिडे यांची पिशवी पोलिसांच्या ताब्यात दिली. भिडे यांनी पोलीस आणि रिक्षाचालकांचे मनोमन आभार मानले.
----