लोहगावमध्ये अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीला बिहारमधून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:36 PM2022-02-16T20:36:46+5:302022-02-16T20:51:07+5:30
घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते...
येरवडा: येरवडा - अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून करून पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी बिहार येथे जाऊन शिताफीने सापळा रचून अटक केली. या खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद गुलाब मोहम्मद मुक्तार शेख (वय 32, रा. मूळचा बिहार, सध्या राहणार पठारे वस्ती लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी मोझेआळी लोहगाव येथे एक महिला स्वतःच्या घरात बाथरूम मध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली होती. संशयास्पद रित्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे शव विच्छेदनानंतर सदर महिलेचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याचा अहवाल विमानतळ पोलिसांना प्राप्त झाला होता. अधिक तपासात अनैतिक संबंधातून त्यांच्याच घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपी मोहम्मद मुख्तार शेख याचा शोध घेण्यासाठी तात्काळ विशेष पथक त्याच्या मूळ गावी बिहार येथे पाठविण्यात आले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून त्यानेच सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक, पोलीस उपनिरीक्षक एस.ए. जाधव, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश धेंडे, विनोद महाजन,किरण अब्दागिरे, रिहान पठान, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शिताफीने तपास केला.