दिवाळीनिमित्त घरातील साफसफाई करताना महिलेने कचरा म्हणून चक्क सोन्या-चांदीचे दागिने फेकले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 06:25 PM2020-11-09T18:25:01+5:302020-11-09T18:29:35+5:30
साफसफाईच्या वेळी एका महिलेने चक्क सुनेसाठी तयार केलेले सोने-चांदीच्या दागिन्यांची पर्स कचरा म्हणून घंटा गाडीत टाकून दिली...
पुणे : दिवाळी जवळ आली की घरोघरी साफसफाईची मोहीम हमखास हाती घेतली जाते.यात महिला वर्ग आपलं घरदिवाळी निमित्ताने जास्तीत जास्त कसं स्वच्छ दिसेल यासाठी आघाडीवर असतो. या साफसफाई दरम्यान घरातील नको असलेला सर्व कचरा म्हणून त्याची विल्हेवाट लावली जाते . मात्र साफसफाईच्या वेळी एका महिलेने चक्क सुनेसाठी तयार केलेले सोने-चांदीच्या दागिन्यांची पर्स कचरा म्हणून घंटा गाडीत टाकून दिली. ही गोष्ट जेव्हा कुटुंबातील लोकांच्या लक्षात आली तेव्हा सुरु झाली धावपळ आणि शोधाशोध..
संबंधित महिलेने दिवाळीनिमित्त रविवारी( दि. ८) घरातील सफाईचे काम हाती घेतले होते. यावेळी काही तपासणी न करता वापरात नसलेली पर्स तिने कचऱ्यात टाकून दिली. उशिराने मग आपण दागिन्यांची पर्स कचरा म्हणून टाकून दिली आहे हे महिलेच्या लक्षात आले. तोपर्यंत रविवारी सकाळी घंटा गाडीने कचरा गोळा करून तो मोशी येथील कचरा डेपोत खाली करण्यात आला. त्याचवेळी संबंधित महिलेने मोशी येथे कचरा डेपोत संपर्क परिसरातील कचऱ्याच्या घंटा गाडीत नजरचुकीने सोन्या व चांदीचे दागिने पर्ससह टाकण्यात आल्याची माहिती दिली. सफाई कामगार हेमंत लखन यांनी तब्बल १८ टन कचऱ्यातून त्या महिलेची सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स शोधून काढली. आणि संबंधित महिलेला प्रामाणिकपणे परत केली.
रविवारी सकाळी घंटा गाडीने कचरा गोळा करण्यात आला. तो मोशी येथील कचरा डेपोत खाली करण्यात आला. दरम्यान, एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पर्ससह कचऱ्यात गेल्याचं सांगितलं. संबंधित महिलेने दिवाळीनिमित्त घरातील सफाईचे काम सुरू होते. तेव्हा, काही विचार न करता ती पर्स वापरातील नसल्याने तशीच कचऱ्यात टाकून दिली. नंतर हा प्रकार लक्षात आला.
संबंधित कर्मचारी हेमंत लखन यांनी सांगितले की, एका दागिन्यांची पर्स कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीत टाकली गेल्याचे सांगितले. त्यानंतर कचरा डेपोत आम्ही शोधाशोध सुरू केला. डेपोतील जवळपास अठरा टन कचरा तपासला आणि अखेर ती सोने दागिने यांची पर्स मिळाली. हे दागिने या कुटुंबासाठी फार महत्वाचे होते. कारण त्या महिलेने स्वतःच्या सुनेसाठी अतिशय कष्टाने पै पै गोळा करून ते दागिने बनवले होते. हे जाणून आम्ही कष्ट घेत त्या दागिन्यांच्या पर्सचा शोध घेतला. आणि त्यांना ती पाच ग्रॅम सोन्याचे पेंडल आणि चांदीचे जोडवे असलेली दागिन्यांची पर्स परत केली. त्याक्षणी त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद आम्हाला समाधान देणारा ठरला..