महिला उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 10:37 PM2017-12-06T22:37:16+5:302017-12-06T22:37:26+5:30
पुणे : तक्रारीवर कारवाई करू नये, यासाठी ३७ हजार रुपयांची घेताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
पुणे : तक्रारीवर कारवाई करू नये, यासाठी ३७ हजार रुपयांची घेताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सपना विजयकुमार सोळंकी (वय २७, रा. परमानगर, फातिमानगर) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांची वारजे पोलीस चौकीला नेमणूक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणा-या तक्रारदारांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी सपना सोळंकी यांच्याकडे होती. या तक्रार अर्जात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या अर्जावरून कारवाई न करण्यासाठी सपना सोळंकी यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ३७ हजार रुपये देण्याचे ठरले. वारजे पोलीस चौकीत बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडे ३७ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.