पुण्यातील हॅरिश पुलावरून महिलेने बाळासह घेतली उडी, महिलेचा मृतदेह आढळला, बाळाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 07:53 PM2017-11-20T19:53:28+5:302017-11-20T19:53:40+5:30
दापोडी येथील हॅरिस पुलावरून दोन वर्षाच्या बाळासह मुळा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बुरखाधारी महिला असल्याने पुलावरून तिचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
पिंपरी : दापोडी येथील हॅरिस पुलावरून दोन वर्षाच्या बाळासह मुळा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बुरखाधारी महिला असल्याने पुलावरून तिचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून तिच्याबरोबर नदीपात्रात पडलेल्या बाळाचा शोध घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. ही शोध मोहीम सुरू असतानाच पुणे-लोणावळा या रेल्वेगाडीतून प्रवास करणारा एक प्रवासी हॅरिसपुलावरून नदीपात्रात पडला. बाळाचा शोध घेत असताना, रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी जवानांना धावपळ करावी लागली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहापुरी असलम शेख (वय २०, रा. वाकड), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. औंध येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे. महिलेबरोबर नदीपात्रात पडलेल्या जिशान असलम शेख (वय २) या चिमुकल्याचा अग्निशामक दलाचे जवान शोध घेत होते. शोध मोहीम सुरू असतानाच पुणे-लोणावळा या लोकलमधून अंदाजे ४० ते ४२ वर्षे वयाचा एक प्रवाशी अचानक नदी पात्रात पडला. जवानांनी बाळाची शोध मोहीम थांबवून प्रवाशाला आगोदर बाहेर काढले. कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळ होताच अंधार पडू लागल्याने जिशान शेख या चिमुकल्याचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. उशीरापर्यंत बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
घरी झालेल्या किरकोळ भांडणामुळे रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या शहापुरी शेख हॅरीस पुलावर आल्या. त्यांनी दोन वर्षाच्या जिशानसह पुलावरून उडी मारली. घटनेची माहिती पसरताच, या परिसरात बघ्यांची गर्दी झाली. घटनास्थळी औंध व पुणे महापालिका अग्निशामक दलाच्या चार गाड्या, बोट ,१३ जवान दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला, त्याचवेळी रेल्वेचा प्रवासी नदीपात्रात पडला, त्याचे या जवानांनी प्राण वाचविले.