'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:23 PM2021-10-22T18:23:40+5:302021-10-22T18:23:49+5:30

महिलेला सैतानाचा अवतार असल्याची बतावणी करत मांत्रिकाच्या सल्ल्याने अंगावरील कपडे काढून तिचा गळा दाबत बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पुल (ता.बारामती) येथे घडला.

The woman was harrasement in Baramati | 'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य

'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य

Next
ठळक मुद्देसासरच्या चौघांसह मांत्रिक अशा पाचजणांविरोधात गुन्ह दाखल

बारामती : महिलेला सैतानाचा अवतार असल्याची बतावणी करत मांत्रिकाच्या सल्ल्याने अंगावरील कपडे काढून तिचा गळा दाबत बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पुल (ता.बारामती) येथे घडला. या महिलेला अघोरी कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  
    
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीस वर्षीय महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेचा २९ मे १९९४ रोजी विवाह झाला आहे. फिर्यादी महिला दोन दिर, पती, दोन मुले, सासुसह करंजे पुल येथे एकत्रित वास्तव्यास आहे. या महिलेचे पती नामवंत बँकेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

दरम्यान,या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या सासरच्या चौघांसह मांत्रिक अशा पाचजणांविरोधात महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या नावाचा मांत्रिक (नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासू आहेत. महिलेचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात हुंडा जादा दिला नाही, या कारणावरून तिचा छळ केला जात होता. वारंवार मारहाण व जाचहाट केला जात होता. नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांना भरीस घातले. दोन्ही दीर  व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याने सांगितल्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले. 
 
महिलेला मुलगी झाल्यानंतर सासूने तु पांढऱ्या पायाची असून आमच्या घरी राहू नको, असे म्हणत तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन्ही दीर व सासू यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपडून लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारले. तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ असे म्हणत तिचा गळा जाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्याच दिवशी दीर व सासूने तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुकंवाचे रिंगण करत त्यात फिर्यादीला बसवून कपडे काढले. त्यानंतर  अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले. दीर व सासूने तिच्या तोडात कापसाचा बोळा कोंबून तिला डांबून ठेवले. हा प्रकार पती व मुलाला सांगितले तर तुला मारुन टाकू  अशी धमकी दिली. फिर्यादीच्या रडण्याने शेजारी राहणाऱ्यांनी तेथे येत तिची सुटका केली. त्यानंतर फिर्यादीने ही घटना आई - वडीलांना कळवली. शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  

Web Title: The woman was harrasement in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.