Pune: विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, लष्करी जवानासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: April 27, 2024 04:02 PM2024-04-27T16:02:29+5:302024-04-27T16:14:40+5:30
याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी लष्करी जवानासह अन्य तीन जणांविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लष्करी जवान राहुल रवींद्र पाटील (रा. हनुमाननगर, कोल्हापुरी गेट, अमरावती), रवींद्र पाटील, शारदा पाटील आणि पूजा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पाटील लष्करात जवान आहे. त्याचा विवाह झाला आहे. विवाह झाल्यानंतर देखील त्याने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याची नागपूरमधील एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख झाली. पत्नीशी पटत नसल्याने घटस्फोट घेणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. विवाहाच्या आमिषाने महिलेला त्याने जाळ्यात ओढले.
त्यानंतर महिलेने पाटीलची पुण्यात भेट घेतली. पुण्याहून ते खासगी प्रवासी बसने अमरावतीला गेले. बस प्रवासात त्याने महिलेशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर अमरावती परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेची छायाचित्रे काढून समाजमाध्यमात प्रसारित केली. विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला नकार दिला. राहुल पाटीलचे वडील रवींद्र पाटील हे महिलेच्या घरी गेले. तेथे जात त्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा करत यावेळी मी एकटा आलो आहे, परत एकटा येणार नाही, माझा मुलगा लष्करात आहे, अशी धमकी दिली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करत आहेत.